सावधान! कोयनेतून कोणत्याही क्षणी पाणी येणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

विजय लाड
Tuesday, 22 September 2020

धरण भरल्याने शेतीसह सिंचन अन्‌ विजेचा प्रश्न निकालात निघाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक तीन हजार 308 क्‍युसेक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मागील वर्षापेक्षा यंदा पाऊस कमी झाला आहे. मात्र, तरीही कोयना धरण पूर्णक्षमतेने भरले आहे.

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरण आज (ता. २२) पूर्णक्षमतेने भरले. धरणातील पाणीसाठा 105.03 टीएमसी झाला आहे. राज्यासाठी वरदायिनी ठरलेले कोयना धरण सलग दहाव्या वर्षी पूर्णक्षमतेने भरले आहे. दरम्यान, धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन धरण व्यवस्थापनाने केले आहे. 

धरण भरल्याने शेतीसह सिंचन अन्‌ विजेचा प्रश्न निकालात निघाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक तीन हजार 308 क्‍युसेक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मागील वर्षापेक्षा यंदा पाऊस कमी झाला आहे. मात्र, तरीही कोयना धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने 15 ऑगस्ट रोजी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले होते. 

कोयना शतकाच्या उंबरठ्यावर; धरण क्षेत्रात मुसळधार!

धरणात आतापर्यंत 115 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून 19.65 टीएमसी विनावापर, तर पायथा वीजगृहातून 9.61 टीएमसी असे 29.26 टीएमसी पाणी नदीपात्रात सोडले आहे. एक जून 45.80 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration Warns Riverside Villages Satara News