शिवेंद्रसिंहराजेंनी दादांकडून आणला काेट्यावधींचा निधी

उमेश बांबरे
Tuesday, 20 October 2020

यामुळे कास धरण प्रकल्पाचे रखडलेले काम लवकर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सातारा : वाढीव निधी मिळत नसल्याने कास तलावाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. तलावास वाढीव 58 कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे श्री. पवार यांनी साेमवारी (ता.19) या वाढीव निधीला प्रशासकीय मान्यता देत निधी मंजूर केला आहे. यामुळे निधीअभावी थांबलेले काम आता लवकरच पुन्हा सुरू होऊन हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
 
सातारा शहरासह परिसरातील 15 गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्‍यक होते. त्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कॉंगेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले होते. त्याचवेळी पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध झाला होता, तसेच वन विभाग, हरित लवाद यासह अनेक विभागांच्या परवानगी शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून मिळाल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सद्यपरिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम 75 ते 80 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम रखडले होते. त्यामुळे कास धरणचे काम पूर्णत्वास जाणार का, साताऱ्याचा पाणीप्रश्‍न सुटणार का, असे प्रश्‍न निर्माण झाले होते. मात्र, पुन्हा शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी वाढीव 58 कोटी निधीला मान्यता दिली होती; परंतु या निधीला वित्त विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्‍यक होते. त्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरू होता.

जप्तीच्या आदेशानंतर किसन वीर चे अध्यक्ष म्हणाले, आमचेही प्रयत्न सुरू आहेत

साेमवारी मंत्रालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह पाणीपुराठा विभागाचे अतिक्ति मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सहसचिव हजारी, वित्त विभागाचे सचिव मित्तल, सातारा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, सहायक अभियंता जयवंत बर्गे, शाखा अभियंता आरिफ मोमिन, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता चौगुले, उपविभागीय अभियंता जी. आर. कुलकर्णी आदी उपस्थित होते. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांनी कास प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजूर करण्याची मागणी केली. या प्रकल्पामुळे सातारा- कास ते बामणोली हा रस्ता बाधित झाला असून, या रस्त्यावरील नवीन पुलालाही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

इच्छापूर्ती दुर्गामाता मंदिराचा दरवाजा बंद, महोत्सव सुरू

उपमुख्यमंत्री पवार यांनी तत्काळ वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन नवीन पुलासाठी 2.78 कोटी निधी आणि कास धरण प्रकल्पासाठी वाढीव 58 कोटी रुपये निधीस मान्यता देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. श्री. पवार यांच्या सूचनेनुसार वित्त विभागाने तत्काळ 58 कोटी रुपये निधीला प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे कास धरण प्रकल्पाचे रखडलेले काम लवकर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Released Fund For Kass Dam Project Shivendrasinghraje Bhosale Satara News