'निवडणूक कठीण आहे, तुझं काही खरं नाही; पण मी चौथ्यांदा..' I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramraje Naik-Nimbalkar

प्रत्येक निवडणुकीत निष्ठावंत सहकाऱ्यांच्या ताकदीवर विजयश्री खेचून आणणार आहे.

'निवडणूक कठीण आहे, तुझं काही खरं नाही; पण मी चौथ्यांदा..'

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : सातारा जिल्हा बँकेची निवडणूक (Satara Bank Election) चौथ्यांदा जिंकलो असून त्यातील दोनदा बिनविरोध निवडून आलोय. यापुढील काळात माण तालुक्यातील (Maan Taluka) सर्व निवडणुका ताकदीने लढणार आहे, असे अनिल देसाई (Anil Desai) यांनी नमूद केले.

जिल्हा बॅंकेचे संचालकपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर अनिल देसाई यांचे नुकतेच दहिवडीत फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मजूर फेडरेशनचे संचालक पिंटू जगदाळे, रफिक मुलाणी, दादासाहेब शिंदे, आण्णा मगर, दाजीराम पवार, समीर ओंबासे आदी उपस्थित होते. देसाई म्हणाले, ‘‘अनेक जण वेगवेगळ्या वावड्या उठवत होते. मला यावेळी निवडणूक कठीण आहे. माझं काही खरं नाही. पण, मला माझ्या विजयाची पूर्ण खात्री होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेऊन मला पॅनेलमध्ये घेतले.

हेही वाचा: प्रभाकर घार्गेंची बंडखोरी राष्ट्रवादीला महागात पडणार?

मागील निवडणुकीत माझ्याविरोधात १३ अर्ज भरण्यात आले होते. यावेळी ती संख्या आठवर आली. सर्व परिस्थिती पाहून तसेच विनंतीला मान देत विरोधातील सर्वांनी अर्ज काढून घेतले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा मला बिनविरोध संचालक होता आले.’’ देसाई पुढे म्हणाले, ‘‘यापुढील काळात जो पक्ष लोकांचे काम करेल, त्यांचा झेंडा हाती घेणार आहे. पण, तोपर्यंत माणमधील म्हसवड नगरपालिका, दहिवडी नगरपंचायत तसेच सर्व जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण हे समविचारींना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने लढणार आहे. माझा पराभवाचा काळ संपला असून यापुढील प्रत्येक निवडणुकीत निष्ठावंत सहकाऱ्यांच्या ताकदीवर विजयश्री खेचून आणणार आहे.’’ यावेळी माण तालुका पत्रकार संघाच्या वतीने अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: निवडणुकीत सर्व 'राजे' बिनविरोध होऊन निवांत झाले; पण 'याचं' काय?

loading image
go to top