Political : निवडणुकीत सर्व 'राजे' बिनविरोध होऊन निवांत झाले; पण 'याचं' काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank Election

बँकेच्या निवडणुकीत सर्व राजे बिनविरोध होऊन निवांत झाले आहेत; पण..

निवडणुकीत सर्व 'राजे' बिनविरोध होऊन निवांत झाले; पण 'याचं' काय?

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) सर्व राजे बिनविरोध होऊन निवांत झाले आहेत. पण, त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde), जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते आणि सत्यजितसिंह पाटणकर, शेखर गोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात ठेऊन गंमत बघत आहेत. कऱ्हाड, जावळी, पाटण व माण सोसायटीत काट्याच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. माण सोसायटीत आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांच्या हातात विजयाची गणिते अवलंबून आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कऱ्हाड सोसायटीत सहकारमंत्र्यांविरोधात (कै.) विलासराव पाटील- उंडाळकरांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात १४० मते असून सहकारमंत्र्यांकडे १०० मते असल्याचा दावा केला जात आहे. माजी आमदार आनंदराव पाटील यांच्याकडे दोन, भाजपचे नेते ॲड. अतुल भोसले यांच्याकडे १९ मते आहेत. ॲड. उदयसिंह पाटलांकडे ८३ मते असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या सर्व दावे-प्रतिदाव्यांत अतुल भोसले यांची मते कोणाच्या पारड्यात जाणार, त्यांचे पारडे जड होणार आहे. (कै.) उंडाळकरांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत ॲड. उदयसिंहांच्या पाठीशी राहणार की सहकारमंत्र्यांच्या बाजूने, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. या मतदारसंघात सहकारमंत्र्यांसाठी राष्ट्रवादीकडून सर्व प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: नाकाबंदी भेदत राजेंची जिल्हा बॅंकेत दमदार एन्ट्री

जावळी सोसायटी मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे विरुध्द ज्ञानदेव रांजणे अशी लढत आहे. या लढतीत रांजणे यांचे पारडे जड असल्याचे सांगितले जाते. हा मतदारसंघ आमदार शिंदेंचे होमपीच असल्याने ते सर्व ताकद लावून विजयश्री मिळविण्याचा प्रयत्न करतील. तरीही रांजणेंच्या बाजूने राष्ट्रवादीसह राजे गटाचीही ताकद असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी शशिकांत शिंदेंविरोधात चक्रव्यूह रचल्याचे चित्र आहे. जावळी सोसायटीत एकूण ४९ मते असून ज्ञानदेव रांजणे यांच्याकडे ३२ मते असल्याचा दावा असून त्यांनी २६ मतदार अज्ञानस्थळी रवाना केले आहेत. आमदार शशिकांत शिंदेंच्या वाट्याला १७ मते असल्याचे सांगितले जात आहे. विजयासाठी २५ मते आवश्यक आहेत. त्यामुळे येथे काट्याची टक्कर होणार आहे. पाटण सोसायटी मतदारसंघात सत्यजितसिंह पाटणकर विरुध्द शंभूराज देसाई असा सामना रंगला आहे. पाटण सोसायटीचे १०३ मतदार आहेत. त्यापैकी पाटणकरांकडे ५४ मते असल्याचे सांगितले जाते. देसाईंकडे ४५ मते असल्याचा दावा आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पाटणकरांचे पारडे जड असले तरी देसाई यांनी ही निवडणूक ‘आम्ही लढण्यासाठी जिंकणार,’ असल्याचे सूतोवाच केलेले आहे. प्रत्यक्ष लढतीवेळी कोण कोणाची मते पळविणार, यावर सर्व अवलंबून आहे. येथे गृहराज्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

हेही वाचा: अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्र्यांसह गृहराज्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

खटाव सोसायटी मतदारसंघात प्रभाकर घार्गे विरुध्द नंदकुमार मोरे अशी लढत आहे. यामध्ये नंदकुमार मोरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचविलेले उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे नेते खटावमध्ये लक्ष घालणार, हे निश्चित आहे. पण, आजपर्यंत प्रभाकर घार्गे यांनी खटाव तालुक्यात राष्ट्रवादीला ताकद देण्याचे काम केलेले आहे. पण, एका घटनेमुळे त्यांना डावलण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांनी कोठडीतूनच निवडणूक लढून विजयी होण्याची तयारी केली आहे. खटाव सोसायटीत १०३ मते असून सर्वाधिक मते प्रभाकर घार्गे यांच्याकडेच असल्याचे सांगितले जात आहे. पण, ही मते राष्ट्रवादीची असल्याने त्यामध्ये विभागणी होणार आहे. त्यामुळे नंदकुमार मोरे यांना ही निवडणूक सोपी नाही. राष्ट्रवादीकडून किती मते मिळविण्याचा प्रयत्न होणार, त्यावर सर्व काही अवलंबून आहे. माण सोसायटी मतदारसंघात शेखर गोरे आणि मनोजकुमार पोळ यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात एकूण ७४ मते असून सर्वाधिक २९ मते शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीकडे हक्काची १६ मते असून आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे २३ मते असल्याचे सांगितले जाते. आमदार गोरे बाजू घेणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे. आमदार गोरेंनी ऐन निवडणुकीतून माघार घेत निवडणुकीतील आव्हान संपुष्टात आणले आहे. पण, ते माण सोसायटीतून राष्ट्रवादीला पळविण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: 'भाजपला सोबत घेऊन NCP नं 11 जागा केल्या बिनविरोध'

ओबीसी मतदारसंघात घोडेबाजार होणार?

ओबीसी मतदारसंघात सहकार पॅनेलचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते व शिवसेनेचे माणचे नेते शेखर गोरे यांच्यात लढत आहे. या आरक्षणातील उमेदवारांना सर्व मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे येथे घोडेबाजार होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीची ताकद व मते जास्त असल्याने प्रदीप विधातेंना या मतदारसंघात निवडणूक सोपी होणार आहे.

loading image
go to top