प्रभाकर घार्गेंची बंडखोरी राष्ट्रवादीला महागात पडणार? अजित पवारांच्या उमेदवाराविरुध्द 'शड्डू' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prabhakar Gharge

निवडणुकीत घार्गे गटाची मते विरोधात गेली तर प्रचंड डोकेदुखी वाढणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते चिंतेत आहेत.

प्रभाकर घार्गेंची बंडखोरी राष्ट्रवादीला महागात पडणार?

विसापूर (सातारा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये (Satara Bank Election) खटाव प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार नंदकुमार मोरे (Nandkumar More) यांच्याविरोधात माजी आमदार प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) यांनी बंडाचे निशाण फडकावत प्रभावीपणे शड्डू ठोकल्याने या लढतीला महत्त्‍व आले आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress Party) बालेकिल्ला समजला जात असला तरी कृषी पतपुरवठा मतदारसंघावर कायम वरचष्मा ठेवणाऱ्या श्री. घार्गे यांची बंडखोरी राष्ट्रवादीला त्रासदायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीने आणि खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खटावमध्ये येऊन जिल्हा बॅंकेसाठी श्री. मोरे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. तर सलग १५ वर्षांहून अधिक काळ या मतदारसंघाचे नेतृत्व श्री. घार्गे यांनी केले आहे. त्यामुळे एका बाजूला सत्ताधारी पक्षाची ताकद व दुसऱ्या बाजूला मतदारांशी घरोब्याचे संबंध अशी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. दोन्हीही उमेदवार तुल्यबळ असल्याने या मतदारसंघात मतांची विभागणी कशी होणार?, कोण कोणासमवेत जाणार? एखादे नवीन राजकीय समीकरण जुळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्र्यांसह गृहराज्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावात श्री. घार्गे यांचा दांडगा संपर्क असून, छोटा का होईना परंतु, राजकीय गट अस्तित्वात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत श्री. घार्गे गटाची ही बहुमूल्य मते विरोधात गेली तर प्रचंड डोकेदुखी वाढणार असल्याने राष्ट्रवादीचे काही नेते चिंतेत आहेत. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील संभाव्य धोका लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी श्री. घार्गे यांना छुपा पाठिंबा दिला तर श्री. मोरे यांना अडचणीचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री. मोरे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीसाठीदेखील ही निवडणूक महत्त्वाची झाली आहे. उपमुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागल्याने श्री. मोरे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची जबाबदारी वाढली आहे. लढाई चुरशीची असल्याने उपमुख्यमंत्री पवार यांना अपेक्षित असलेला निकाल मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांना स्वतः लक्ष घालून प्रयत्न करावे लागणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: 'भाजपला सोबत घेऊन NCP नं 11 जागा केल्या बिनविरोध'

दोन्ही बाजूंनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर होणार

दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच श्री. मोरे यांनी मतदार आणि प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेत शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर मतदारांशी दांडगा संपर्क असलेले श्री. घार्गे हे न्यायालयीन प्रकरणात अडकल्याने त्यांच्या अनुपस्थित कुटुंबीयांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. आजची परिस्थिती पाहता दोन्ही बाजूंनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर होणार असल्याने विजयश्री खेचून आणण्यात कोण यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा: निवडणुकीत सर्व 'राजे' बिनविरोध होऊन निवांत झाले; पण 'याचं' काय?

loading image
go to top