
हुतात्मा सुजित किर्दत यांचे पार्थिव ग्रामपंचायतीजवळील चौकात ग्रामस्थ व इतरांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अंगापूर (जि. सातारा) : चिंचणेर निंब (ता. सातारा) येथील हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवाची ग्रामस्थांना अजून प्रतीक्षा असून, आज (बुधवार) सायंकाळपर्यंत ते गावात पोचण्याची शक्यता आहे. पुण्यातील विमानतळावर आज (बुधवार) सकाळी हुतात्मा किर्दत यांचे पार्थिव आल्यानंतर तेथे त्यांना लष्काराकडून सलामी देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
सिक्किम येथे रस्ता अपघातात हुतात्मा झालेले जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवाची गेल्या दोन दिवसांपासून कुटुंबीय व ग्रामस्थ प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्यावर शासकीय इतमामात होणाऱ्या अंतिम संस्काराची संपूर्ण तयारी ग्रामस्थ व प्रशासनाने केली असून, संपूर्ण गावात श्रद्धांजलीचे फलक रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत. हुतात्मा किर्दत यांच्या आठवणींने चिंचणेर ग्रामस्थ व्याकूळ झाले आहेत.
अंतिम संस्कार कृष्णा नदीतिरी होणार असून, तेथे चौथरा बांधण्यात आला आहे. पार्थिवाचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण गावातून अंत्ययात्रा निघणार असून, त्यांच्या घरी काहीकाळ ते कुटुंबीयांच्या दर्शनासाठी ठेवणार आहेत. त्यानंतर पार्थिव ग्रामपंचायतीजवळील चौकात ग्रामस्थ व इतरांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Edited By : Siddharth Latkar