सातारा : दंड केल्याने आत्महत्येचा प्रयत्न

ट्रिपल सीट आलेल्या युवकाकडून भररस्त्यात प्रकार
 दंड
दंडSakal

सातारा - ट्रिपल सीट वाहन चालविल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगितल्यामुळे वाहतूक पोलिसासमोरच अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज लोखंडे (वय ३४, मूळ रा. कामेरी, ता. सातारा, सध्या रा. शाहूपुरी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत वाहतूक पोलिस सोमनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास शिंदे हे येथील मुख्य बस स्थानकासमोर वाहतूक नियमनाचे काम करत होते. या वेळी लोखंडे हा ट्रीपलसीट वाहन चालवत आला. त्याला शिंदे यांनी अडविले. त्याच्याकडे लायसन्सही नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी लायन्सस नाही, म्हणून पाच हजार, ट्रीपलसीटचा दंड एक हजार, नंबर प्लेट नसल्यामुळे ५००, तसेच मोठा हॉर्न लावल्यामुळे शंभर असा सुमारे सात हजार रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले.

यावरून लोखंडेने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. अखेरी ट्रीपलसीट असल्यामुळे कमीतकमी १ हजार रुपये दंड भरावाच लागेल, असे शिंदे यांनी त्याला सांगितले, तरीही चिडून तो पळतच भूविकास बॅंकेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर गेला. तेथून कॅनमधून डिझेल घेऊन परत आला. त्यानंतर त्याने शिंदे यांच्यासमोरच डिझेल अंगावर ओतून घेतले. मात्र, काडी पेटविण्याआधीच त्याला नागरिकांनी पकडले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी लोखंडेला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर शिंदे यांच्या फिर्यादीनुसार त्याच्यावर शासकीय कामात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com