
पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून झालेल्या आंबळे ते घाटेवाडी रस्त्याची दुर्दशः झाली असून, यातील धुमकवाडी ते मुरूड ते मालोशी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.
तारळे (जि. सातारा) : पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून झालेल्या आंबळे ते घाटेवाडी रस्त्याची दुर्दशः झाली असून, यातील धुमकवाडी ते मुरूड ते मालोशी रस्त्याची अक्षरक्षः चाळण झाली आहे. मार्गावर सर्वत्र खड्ड्यांची साखळी तयार झाल्याने खड्डे व खाचखळग्यातून प्रवास करावा लागत आहे. चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोकाही आहे. शिवाय लोकांना वेगवेगळे विकार जडलेले आहेत, तर वाहने खिळखिळी झाली आहेत. यावर मलमपट्टी पुरेशी नसून रस्त्याच्या संपूर्ण नूतनीकरणाची मागणी होत आहे.
रस्त्यात एवढे खड्डे आहेत, की रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. मुळातच रस्त्याचे दर्जेदार काम न झाल्यामुळे दर वर्षी रस्त्यावर खड्ड्यांची मालिका निर्माण होत गेली. सध्या रस्त्याची एवढी दारुण अवस्था झाली आहे, की वाहने खिळखिळी होण्याबरोबरच लोकांना मानेचे व कंबरेचे पाठदुखीचे विकार जडले आहेत. गेली दोन वर्षे डागडुजीकडे पूर्णत दुर्लक्ष झाले आहे. गेल्या वर्षी कुशी ते धुमकवाडीपर्यंत रस्ता नूतनीकरण झाले आहे.
लालपरीशिवाय शाळा-कॉलेजला जायचं कसं?, विद्यार्थ्यांचा प्रशासनाला सवाल
सध्या तारळी धरणाच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. परिणामी, दयनीय रस्त्याची अजूनच दारुण अवस्था झाली आहे. दरम्यान, पाऊस झाल्याने रस्त्यावर मातीचाही थर बसला असून, प्रवासात प्रचंड धूळ उडत आहे. याचा प्रचंड त्रास जनतेला होत आहे. धुमकवाडी ते मालोशी रस्त्याच्या नूतनीकरणाच्या मागणीने जोर धरला आहे. रस्त्याच्या दुर्दशेने व्यवसायांवर व अर्थकारणावरदेखील विपरित परिणाम होत आहे. शिवाय पर्यटकांतून नाराजी उमटत आहे. तात्पुरत्या डागडुजीला जनता वैतागली असून, रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण करावे, अशी मागणी वाढत आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे