सहकारमंत्र्यांच्या बॅनरवर पहिल्यांदाच झळकले 'भोसले'

Balasaheb Patil
Balasaheb Patilesakal
Summary

सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे धूमशान सुरू आहे.

कऱ्हाड (सातारा) : राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरूपी शत्रू आणि मित्रही नसतो, याचे प्रत्यंतर सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Satara Bank Election) निमित्ताने कऱ्हाड तालुक्यात येत आहे. यापूर्वी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या विरोधात असणाऱ्या भोसले गटाच्या नेत्यांचा फोटो सध्या सहकार पॅनेलच्या उद्याच्या मेळाव्याच्या पोस्टरवर छापण्यात आला आहे. पालकमंत्री पाटील, डॉ. सुरेश भोसले, मदनराव मोहिते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या मेळावाही होणार असल्याचे पत्रिकेत छापले आहे. त्यामुळे मेळाव्यातील भोसले गटाच्या उपस्थितीबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, त्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून (Karad North Assembly constituency) सहकारमंत्री पाटील यांच्या विरोधात भोसले गटाचे डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे सहकारमंत्री पाटील यांचा गट त्यावेळपासून भोसले गटाशी फारकत घेऊन होता. त्यानंतर कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील पाल-चोरे गावाजवळील धावरवाडी येथे भोसले यांनी जयवंत शुगर हा खासगी साखर कारखाना सुरू केला. त्यामुळेही हा वाद आणखीच चिघळला होता. त्या कारखान्याविरोधात सह्याद्री कारखान्याकडून आक्षेप नोंदवत विरोधी कार्यवाहीही सुरू करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही गटांतील अंतर वाढले होते. जाहीर राजकीय सभांतून टीका-टिप्पणीही केली जात होती. मात्र, त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहिले. नुकतीच कृष्णा कारखान्याची निवडणूक (Krishna Factory Election) झाली. त्या निवडणुकीत काही राजकीय संबंध जुळून आल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने सहकाराच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील राजकीय संदर्भ बदलाच्या उंबरठ्यावर आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल.

Balasaheb Patil
'शरद पवारांच्या नावावर ओळख निर्माण करणाऱ्यांनी मोठेपणा दाखवला असता तर..'

दरम्यान, सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे धूमशान सुरू आहे. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलमधून सोसायटी गटातून सहकारमंत्री पाटील हे माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. सहकार पॅनेलची कऱ्हाड तालुक्यातील पहिली प्रचारसभा उद्या (गुरुवारी) होत आहे. त्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील आदी उपस्‍थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी छापलेल्या सहाकारमंत्र्यांच्या बॅनरवर दशकानंतर पहिल्यांदाच भोसले गटाचे (कै.) जयवंतराव भोसले, डॉ. सुरेश भोसले यांचे फोटो छापण्यात आले आहेत. त्याचबरोबर डॉ. भोसले व मदनराव मोहिते हे दोन्ही नेते उद्याच्या मेळाव्यास उपस्थितही राहणार असल्याचे पत्रिकेत छापले आहे. त्यामुळे उद्याच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Balasaheb Patil
मानेंचा पत्ता कट करून महाडिकांना उतरवलं मैदानात

मेळाव्यास पृथ्वीराज चव्हाणही येणार

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे थेट प्रचारात दिसत नाहीत. काँग्रेस गटाचे अॅड. उदयसिंह पाटील हे पालकमंत्र्यांच्या विरोधात निवडणुकीत उतरले आहेत. सहकार पॅनेलच्या उद्याच्या मेळाव्याच्या जाहिरातीत पृथ्वीराज चव्हाण यांचा फोटो आणि उपस्थितीत नाव छापण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याही उपस्थितीबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com