'आमदार शिंदेंची दहशत आम्हाला संपवायची होती, म्हणूनच आम्ही..' I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shashikant Shinde

खासदार रणजितसिंह माघार घेत असतील, तर आमदार शिंदेंनी माघार घेतली असती तर काय बिघडलं असतं?

'आमदार शिंदेंची दहशत आम्हाला संपवायची होती, म्हणूनच आम्ही..'

कुडाळ (सातारा) : ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा विजय निश्चित असून, आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी आता जावळीत येऊन दादागिरीचा धंदा बंद करावा. यापुढे त्यांनी अरेरावी केली तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) यांनी दिला आहे.

जिल्हा बँकेच्या जावळीतील सोसायटी मतदारसंघाच्या (Jawali Society Constituency) निवडणुकीनंतर आमदार शिंदे गट व मानकुमरे गट परस्परविरोधी समोरासमोर भिडले होते. मतदानानंतर त्याचा समाचार मानकुमरेंनी ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी प्रसारमाध्यमांसमोर घेतला. मानकुमरे म्हणाले, ‘‘शशिकांत शिंदे यांच्याकडे अनेक पदे आहेत. त्यांनी अजूनही मोठे व्हावे. पण, जावळी तालुक्यामध्ये आता त्यांनी लक्ष घालू नये. आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी जशास तसे उत्तर देऊ. यापुढे त्यांची अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. शिंदे यांची तालुक्यातील दहशत आम्हाला संपवायची होती म्हणूनच एका सर्वसामान्य माणसाला जिल्हा बँकेची उमेदवारी देऊन त्यांच्याविरोधात उभे केले, हाच लोकशाहीचा विजय आहे. यापुढे शिंदेंनी जावळीत कितीही लक्ष घातले तरी आम्हीही त्याला सामोरे जाऊ.

हेही वाचा: 'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

आमदार शिवेंद्रसिंहराजे (MLA Shivendrasinharaje Bhosale) हे सज्जन आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षांत जावळी तालुक्यात कधीही अशांतता निर्माण केली नाही, दहशत माजवली नाही. मात्र, शशिकांत शिंदे निवडणुकीच्या माध्यमातून जावळी तालुक्यात येतात आणि वातावरण गढूळ करतात. यापुढे शशिकांत शिंदे यांनी कितीही लक्ष घालण्याचा प्रयत्न केला तरी जावळीचे आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजेच लोकप्रतिनिधी म्हणून राहतील.’’ ज्ञानदेव रांजणे म्हणाले, ‘‘मतदार जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याने ही निवडणूक अटळ झाली. मला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही निवडणुकीची प्रक्रिया खूप पुढे गेली होती. तिथून माघार घेणे मला शक्य नव्हते. मतदार व जावळीच्या जनतेतून निवडणूक लढवावीच, असा जनरेटा वाढल्याने माझा नाईलाज झाला. उद्या जरी मी निवडून आलो तरी मी शरद पवार व अजित पवार यांच्या विचारांशीच व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे.’’

हेही वाचा: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह निंबाळकर हे दिग्गज नेते माघार घेत असतील तर आमदार शशिकांत शिंदे यांनी माघार घेतली असती तर काय बिघडले असते?

-वसंतराव मानकुमरे, सदस्य, जिल्हा परिषद

हेही वाचा: आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले

loading image
go to top