सहकारमंत्र्यांच्या विजयाने भोसलेंची खुंटी बळकट; काँग्रेसच्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara District Bank Election

'काँग्रेसचा एकही नेता प्रचारासाठी आला नाही. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवली; पण..'

सहकारमंत्र्यांच्या विजयाने भोसलेंची खुंटी बळकट

कऱ्हाड : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लढतीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना डॉ. सुरेश भोसले (Suresh Bhosale), अतुल भोसले (Atul Bhosle) गटाने मोठी मदत केली. त्यांच्या मदतीने सहकारमंत्र्यांचा विजय सुकर झाला. त्यामुळे भोसले गटच या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरला आहे. भोसले गटाने कृष्णा कारखाना निवडणुकीपासून (Krishna Factory Election) आपली विजयी वाटचाल सुरू ठेवली आहे. जिल्हा बॅंकेमुळे बदलणाऱ्या राजकीय समीकरणांतून सहकारमंत्र्यांची साथ मिळून कऱ्हाड दक्षिणधील भोसले गटाची खुंटी बळकट होत आहे. ती भविष्यात मतदारसंघावर अनेक वर्षे वर्चस्व असणाऱ्या काँग्रेससाठी पर्यायाने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांना धोक्याची घंटा ठरू शकते. येणाऱ्या निवडणुकांतून त्याची झलक दिसण्याची शक्यता आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी गटात सहकारमंत्री पाटील हे स्वतः निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या विरोधात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी मतदारांचा कौल आजमावला. ती लढत सहकारमंत्र्यांसाठी मोठी प्रतिष्ठेची बनली होती. त्यासाठी वर्षापासूनच सहकारमंत्र्यांनी मतदारांचा अभ्यास सुरू केला होता. कऱ्हाड दक्षिणमध्ये मतदार जास्त असल्याने सहकारमंत्र्यांनी दक्षिणवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी त्यांचे बंधू जयंत पाटील आणि जवळचे पाहुणे कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या माध्यमातून भोसले गट आपल्याबरोबर घेण्यासाठी ‘फिल्‍डिंग’ लावली. तत्पूर्वी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही काही उलाढाली झाल्या. त्यानंतर अनेक चर्चा, बैठका, भविष्यातील निवडणुकांतील मदतीसंदर्भात खल होऊन जिल्हा बॅंकेसाठी भोसले गटाबरोबर वाटचाल करण्याचे ठरवण्यात आले. भोसले गट आपल्याबरोबर राहील, याचा अंदाज आल्यावर सहकारमंत्र्यांनी भोसले गटाबरोबर असलेले माजी आमदार आनंदराव पाटील, ज्‍येष्ठ नेते मदनराव मोहिते, ज्‍येष्ठ नेते जयसिंगराव पाटील-उंडाळकर, काल्याचे भीमरावदादा पाटील, दयानंद पाटील, जगदीश जगताप यांच्यासह अन्य नेत्यांशीही थेट संपर्क साधून, त्यांची भेट घेत कौल आजमावून जिल्हा बॅंकेतील उमदेवारीसाठी मोट बांधली.

हेही वाचा: 'शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार'

त्यानंतर निकालाच्या आदल्या दिवशीही सहकारमंत्री आणि भोसले गटाच्या थेट ७८ मतदारांच्या उपस्थितीत भोसलेंबरोबर बैठक झाली. तर उंडाळकरांना एकाकी झुंज द्यावी लागली. त्यांच्याबरोबर काँग्रेसचा एकही नेता प्रचारासाठी आला नाही. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवली. त्यात सहकरमंत्र्यांना उंडाळकरांपेक्षा आठ मते जास्त मिळाल्याने त्यांचा विजय झाला. या लढतीत सहकारमंत्र्यांना भोसले गटाने मोठी मदत करून तेच ‘किंगमेकर’ ठरले आहेत. कऱ्हाड दक्षिणमधील मतांच्या जोरावर सहकारमंत्र्यांना विजयी मजल मारता आली. दरम्यान, या निकालाने भोसले गटाची ताकद वाढली आहे. सहकारमंत्र्यांची साथ मिळून कऱ्हाड दक्षिणधील भोसले गटाची खुंटी बळकट होणार आहे. ती भविष्यात मतदारसंघावर अनेक वर्षे वर्चस्व असणाऱ्या काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरू शकते, हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांतून दिसून येईल.

हेही वाचा: NCP उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपाध्यक्षांचा राजीनामा

कऱ्हाड दक्षिणनेच सहकारमंत्र्यांना तारले

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघावर कऱ्हाड सोसायटी गटातील निवडणूक राज्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. त्या निवडणुकीत कऱ्हाड उत्तरमध्ये मतदान कमी होते. त्या तुलनेत कऱ्हाड दक्षिणमध्ये मतदानाची आकडेवारी जास्त आहे. त्यामुळे दक्षिणमधील मतदान आपल्याला मिळावे, यासाठी सहकारमंत्री पाटील यांनी कऱ्हाड दक्षिणमधील नेत्यांवर विश्वास ठेऊन त्यांना बरोबर घेतले. त्या नेत्यांनीही प्रामाणिक काम करून चुरशीच्या लढतीत सहकारमंत्र्यांना साथ देत त्यांना विजयी केले.

हेही वाचा: 'धनशक्तीच्या जोरावरील सत्तेची मस्ती उतरवत तुम्हाला घरी बसवलंय'

loading image
go to top