महाराष्ट्राला खुणावणारी बावधनची सुप्रसिद्ध 'बगाड यात्रा

इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये बगाडाची परंपरा चालत आलेली आहे.
Bavdhan Bagad Yatra
Bavdhan Bagad YatraSakal

बावधनची बगाड यात्रा (Bavdhan Bagad Yatra):

बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे दरवर्षी बगाड यात्रा भरते. इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये बगाडाची परंपरा चालत आलेली आहे. गावातील भैरवनाथाच्या मंदिरामधील सभामंडपात असलेल्या लाकडी खांबावर ठोकलेल्या नालांवरून ते लक्षात येते. होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते तर रंगपंचमीदिवशी येथे बगाड भरतं. ही यात्रा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक ही यात्रा पाहण्यासाठी येत असतात. बावधनच्या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. कारण या खिल्लार बैलांशिवाय इतर कोणताही गोवंश इतक्या ताकतीचा नाही. म्हणूनच बावधनमधील प्रत्येक घरामध्ये एक तरी धिप्पाड खिल्लार बैल सांभाळलेला दिसतो.

Bavdhan Bagad Yatra
गावोगावी यात्रा-जत्रेचा बहर!

बगाड म्हणजे काय?

बावधन येथील यात्रेत जे बगाड वापरले जाते त्याचं वजन तब्बल २ ते ३ टन इतके असते. बागडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती साठी, साठी वरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड अशी बगाडाची रचना असते. बगाडाच्या शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनच्या बगाड यात्रेचा बगाड्या निवडला जातो. ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच व्यक्तीला बागड्या म्हणून निवडले जाते.

बावधन गावातील सुतार समाज मिळून हे बगाड बनवत असतात. यात्रेपूर्वी सलग ८ ते १० दिवस 24 तास काम करून बगाडाचा गाडा पूर्ण केला जातो. बगाडाचा गाडा पूर्णपणे बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो. लोखंडाचा वापर केला जात नाही. आळदांडी चंदनाची असते. बागडाला वापरले जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार असते. बगाड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील विहिरीमध्ये ठेवले जाते. कि जेणेकरून ते पुढील २ वर्ष वापरले जाते.

Bavdhan Bagad Yatra
जमावबंदी आदेश लागू; बावधन बगाड यात्रेत ग्रामस्थांनी भावनांना आवर घालावा : संगीता राजापूरकर

असा असतो बगाडाचा प्रवास-

बगाड खिल्लार बैलांच्या साहयाने ओढले जाते. पहाटे साडेपाचच्या सुमारास बैलांच्या साहाय्याने ते नदीपर्यंत सोमेश्वरापर्यंत ओढत नेलं जाते आणि सकाळी ११ वाजता हे बगाड नदीपासून मंदिरापर्यंत ओढत आणायला सुरवात होते. बगाडाचा मार्ग ७५% शेतामधून तर २५% डांबरी रोड वरून होतो. ओली माती, बांध, थोडीफार पीक असलेली शेती, यामधून बगाड ओढत नेला जातो. खिल्लार बैलांच्या साहाय्याने बगाड ओढण्याची परंपरा आहे. बगाड ज्या शेतामधून ओढत नेले जाते, तिथं पीक खूप जोमात येते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे बगाड आपल्या शेतातून जावं यासाठी प्रत्येक शेतकरी उत्सुक असतो.

धुरवीचे बैल -

बगाडाला एकूण १२ धष्टपुष्ट खिल्लार बैल म्हणजे ६ बैलजोड्या जुंपलेल्या असतात. बगडाजवळ जुंपलेल्या पहिल्या बैलजोडीला "धुरवीची बैल" म्हणतात. धुरवीला जुंपले जाणारे बैल उंच, धिप्पाड, मोठ्या ताकतीची असावी लागतात. तब्बल २ ते ३ टन वजनाचं बगाड जागेवर नुसतं हलवणेही सोपे नसते. हे काम धूरवीची बैल करतात. धूरवीची बैलांनी बगाड जागेवरून हलवलं की सर्व बैल बगाड ओढत पुढे नेतात. शेतातील ओल्या मातीतून जात असताना कधी कधी बगाडाची दगडी चाके मातीमध्ये फसतात. तेव्हा धुरवीच्या बैलांना अफाट टाकत लावावी लागते. त्याशिवाय बगाड हा तिथून बाहेर निघू शकत नाही. बावधन मधील हिरा बैल आणि त्यासारखे अजूनही काही बैल एकाद्या जागी अडकलेले बगाड बाहेर काढण्यासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. गावातील सर्व बैल हे दरवर्षी त्यांच्या ठरलेल्या जागेवर उभे असतात. बगाड १०० फूट पुढे गेला कि बैल लगेच बदलले जातात आणि पुढच्या बैलांना मान दिला जातो. घरच्या दावणीला शांत असलेला बैल "काशिनाथचं चांगभलं" ही गर्जना ऐकताच बैल आपल्या मोठ्या ताकतीसह हवेत झेप घ्यायला तयार होतो. त्या दिवशी काही बैलांना १० ते १५ लोकांशिवाय हाताळणे अवघड असते. एकाच ठिकाणी हजाराहून अधिक खिल्लार जातीवंत, सुंदर, बैल पाहायचे एकमेव ठिकाण म्हणजे बावधनचे बगाड.

असे असते नियोजन-

बावधन गावामध्ये भोसले तरफ आणि एक पिसाळ तरफ समोरासमोर बसून बगाड गावात कसा आणायचा हे ठरवत असतात. बगाड पाहायला संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ३ ते ४ लाख भाविक येत असतात. शिडाला बगाड्या टांगल्या नंतर त्याला पाठीमागे गळ लावलेला असतो. दोन्ही हात वर टांगलेले असतात. दोन माणसे पुढे उभी असतात आणि २ माणसे ही वाघा वर बसलेली असतात. बगाड नेत असताना काही अडचण असेल किंवा बगाड थांबवायचा असेल किंवा पुढे न्यायाचा असेल तर या लोक सूचना देत असतात. बगाडाच्या डाव्या बाजूला १० माणसे आणि उजव्या बाजूला १० माणसे असतात. यातील उजव्या बाजूचा मान पिसाळ तरफ आणि डाव्या बाजूचा मान भोसले तरफ यांना दिलेला असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com