Satara : बिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पळाले पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Bill

बिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पळाले पाणी

सातारा : येथील जीवन प्राधिकरणातील अनागोंदी कारभारात दिवसेंदिवस वाढ होत असून, ठेकेदार आणि इतरांच्‍या निर्णयामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळत आहे. पाणी वापराचा ताळेबंद सरासरीने मांडत अव्‍वाच्‍यासव्‍वा बिले नागरिकांच्या हातात टेकविण्‍यात येत आहेत. याबाबत तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी यात लक्ष घालत नसल्‍याने नागरिकांमध्ये संताप आहे.

प्राधिकरणाच्‍या वतीने शाहूनगर, शाहूपुरी, दरे खुर्द, सदरबझार, करंजे, तसेच इतर उपनगरांना पाणीपुरवठा करण्‍यात येतो. या पाणीपुरवठ्यापोटी सुमारे १९ हजार ग्राहकांची मीटर पडताळणी करून बिल आकारण्‍यात येते. मध्‍यंतरीच्‍या काळात हे काम प्राधिकरणाच्‍या वतीने एका ठेकेदारास देण्‍यात आले. हे काम करताना ठेकेदाराकडून झालेल्‍या चुकांचा मनस्‍ताप नागरिकांना अनेक वेळा सहन करावा लागला आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता नंतरच्‍या काळात मनमानी कालावधीची बिलेदेखील त्‍या ठेकेदाराने ग्राहकांच्‍या माथी मारल्‍याच्‍या अनेक तक्रारी आहेत. ठेकेदार त्‍याच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी करूनही प्राधिकरणाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.

कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे पाणीवापराच्‍या नोंदी न घेताच ‘लॉक’ या सदराखाली बिले ग्राहकांना देण्‍यात येत होती. यानंतर सरासरी बिले तयार करत ती नागरिकांच्या हाती टेकवत प्राधिकरणाने बिल वसुली मोहीम जोरात राबवली. गत आणि चालू मीटर रीडिंगच्‍या तारखा न नोंदवता सध्‍या पाणीवापराची बिले शाहूनगर, शाहूपुरीसह इतर भागांत वाटण्‍यात येत आहेत. बिल दुरुस्‍तीसाठी प्राधिकरणात संपर्क साधणाऱ्या नागरिकांना थातुरमातूर कारणे देत त्‍याठिकाणाहून पिटाळण्‍यात येत आहे.

जास्तीच्या बिलप्रश्‍नी आंदोलनाचा इशारा

प्राधिकरणातील ठेकेदाराच्‍या विरोधात तक्रारी असून, त्‍यावर कोणतीही कार्यवाही अधिकारी, कर्मचारी करत नाहीत. ठेकेदाराच्‍या मनमानीमुळे नागरिकांना मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. अलीकडच्‍या काळात पाणीवापराची जास्‍तीची बिले नागरिकांना देण्‍यात आली असून, त्‍याबाबत अनेक तक्रारी आल्‍या आहेत. या तक्रारींचे संकलन करत प्राधिकरणाच्‍या विरोधात आंदोलन करणार असल्‍याची माहिती माजी पंचायत समिती सदस्‍य संजय पाटील यांनी दिली.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे...

प्राधिकरणातील अनागोंदीविरोधात अनेक नागरिकांनी आपल्‍या तक्रारी लेखी स्‍वरूपात नोंदवल्‍या आहेत. या तक्रारींना केराची टोपली दाखवत प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांची पिळवणूक करत आहेत. सर्वसामान्‍यांची होणारी पिळवणूक थांबवण्‍यासाठी खासदार उदयनराजे भोसले किंवा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेणे आवश्‍‍यक असल्‍याचे मत नागरिक व्‍यक्‍त करत आहेत.

loading image
go to top