Political : राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपचं पॅनेल; उदयनराजेंना डावलणं महागात पडणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

निवडणुकीत राष्ट्रवादीला शह देण्यासाठी आमदार गोरे व खासदार नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे पॅनेल उभे राहणार आहे.

राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपचं पॅनेल; उदयनराजेंना डावलणं महागात पडणार?

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोध करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress Party) रणनीती अडचणीत आल्याचे चित्र आहे. पॅनेलचे प्रमुख असलेल्या सहकारमंत्र्यांची निवडणूक सोपी होण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न अपुरे पडले. तर खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना डावलण्याची भूमिकाही राष्ट्रवादीला त्रासाची ठरणार आहे. तीन जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी खटाव, कोरेगावसह महिला राखीव व बॅंका, पतसंस्थांमधून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. यातून इच्छुकांना रोखून पॅनेलची बिनविरोधच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी आता खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच जिल्ह्यात ठाण मांडून उमेदवार व जागा वाटप अंतिम करावे लागण्याची शक्यता आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सर्वसमावेशक’ला शह देण्यासाठी आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत सर्वसमावेशक पॅनेल उभे राहणार आहे. त्यासाठीची जुळणीही या दोन नेत्यांनी केल्याचे सांगितले आहे. मुळात निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोध करण्याचा घाट घातला होता. त्यासाठीची मतदारसंघनिहाय जुळवाजुळव करतानाच खासदार भोसले व आमदार गोरे यांना बाजूला ठेऊन निवडणूक लढवण्याचे ठरले होते. त्यानुसार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या तीन बैठका घेतल्या. पण, शेवटी जे व्हायचे तेच झाले. (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांना बॅंकेवर घेणे गरजेचे होते. परंतु, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना पुढच्या दाराने निवडून जिल्हा बॅंकेत संचालक व्हायचे होते. त्यांचा अट्टाहास राष्ट्रवादीला अडचणीचा ठरणार असे दिसते आहे. येथे सहकारमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

तर आमदार गोरे, खासदार निंबाळकर यांच्या भाजपप्रणीत सर्वसमावेशक पॅनेलला किती उमेदवार मिळणार, यावर या पॅनेलचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे सर्वाधिक मते असल्याने ते ठरवतील तोच उमेदवार निवडून आणू शकतात. त्यातूनच उदयनराजेंना रोखण्याची खेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. सोसायटी मतदारसंघात माण व खटाव मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे अडचण आहे. खटावमधून विद्यमान संचालक प्रभाकर घार्गे यांना राष्ट्रवादीतूनच विरोध झाला आहे. त्यामुळे येथे नंदकुमार मोरेंना राष्ट्रवादीची ताकद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सूचना झालेली आहे. तर माण मतदारसंघात आमदार गोरेंच्या विरोधात शेखर गोरे, मनोजकुमार पोळ अशी लढत आहे. पण, गोरे बंधू खेळी करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अडचणीत आणू शकतात. येथे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढली गेल्यास राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे, अन्यथा आमदार गोरे हे पुन्हा संचालक होणार, हे निश्चित आहे.

खासदार उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादी व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून उमेदवार दिले आहेत. येथे शिवेंद्रसिंहराजेंकडे सर्वाधिक मते असून, खालोखाल आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील व रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे मते आहेत. ही सर्व मते राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच देण्याची भूमिका या सर्वांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या तरी उदयनराजे अडचणीत असल्याचे चित्र आहे. सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या बॅंका व पतसंस्था मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादीकडून कोणाचा अर्ज ठेवला जाणार, यावर बरेच काही अवलंबून आहे. मजूर संस्था मतदारसंघात अनिल देसाई आजपर्यंत बिनविरोध आलेले आहेत. त्यांच्याविरोधात आता खासदार निंबाळकर, शेखर गोरे, चंद्रकांत जाधव यांचे अर्ज आहेत. त्यामुळे यावेळेस त्यांचीही अडचण होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सर्वसमावेशक पॅनेलचे जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध होण्यासाठी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत अनेक समझोते करावे लागतील, अन्यथा भाजपप्रणीत पॅनेल राष्ट्रवादीपुढे अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या तीन जागा बिनविरोध

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीच्या तीन जागा बिनविरोध झाल्या. पण, शिवरुपराजे खर्डेकर वगळता ज्यांच्या हातात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची दोरी आहे, त्या सर्व राजे मंडळींपैकी कोणीही बिनविरोध झालेला नाही. यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर यांचा समावेश आहे.