esakal | राजेंच्या कृतीने भाजपात नाराजी; पालिका निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्वाचा निर्धार
sakal

बोलून बातमी शोधा

राजेंच्या कृतीने भाजपात नाराजी; पालिका निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्वाचा निर्धार

पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. अर्थातच दोन्ही राजेंच्या भूमिकेवरच ते अवलंबून असणार आहे.

राजेंच्या कृतीने भाजपात नाराजी; पालिका निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्वाचा निर्धार

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : भाजपवासी असलेल्या दोन्ही राजांचा आगामी पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर सवता सुभा मांडला जाण्याची शक्‍यता गृहित धरून पक्षाचा झेंडा कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षानेही आपला स्वतंत्र "अजेंडा' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातारा पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होण्याच्या दिशेने पावले पडू लागली आहेत.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
 
सातारा पालिकेची आगामी निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्ध्यांनी आपापली धोरणे व अजेंड्यांचा आरखडा मांडण्यास सुरवात केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या धामधुमीत सुरू असणाऱ्या बैठकांमध्येच महाविकास आघाडी व अन्य पक्षांच्या साथीने सातारा पालिका निवडणुकीत उतरण्याचे जाहीर केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही सातारा पालिका निवडणूक ताकदीने लढण्याचे जाहीर केले. त्यामुळे सातारा पालिकेची निवडणूक कशी होणार याच्या चर्चांना शहरात सुरवात झाली. या कालावधीत सत्ताधारी व प्रमुख विरोधी आघाड्यांकडून मात्र कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त होत नव्हती; परंतु दोन दिवसांपूर्वी ग्रेडसेपरेटरच्या उद्‌घाटनाच्या इव्हेंटच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले म्हणजे पर्यायाने सातारा विकास आघाडीने आपला अजेंडा जनतेपुढे मांडण्यास सुरवात केली. या वेळी गतिमान विकासासाठी "सातारा विकास आघाडी' या स्लोगनचा समावेश असलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. त्यातून पुढील निवडणुकीची त्यांची घोषणाही स्पष्ट झाली. मागील पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते, तरीही मनोमिलनाला तिलांजली देत ते स्वतंत्र आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुकीत आमने-सामने ठाकले. त्या वेळी भाजपने आपली पूर्ण ताकद या निवडणुकीत लावली होती. त्याचा त्यांना फायदाही झाला. पालिका निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपच्या चिन्हावर सहा नगरसेवक निवडूणआले. नगराध्यक्षपदासाठीही तुलनेने चांगली मते मिळाली. त्यातून भाजपची साताऱ्यात एक "वोट बॅंक' तयार होण्यास हातभार लागला.

सातारकरांनाे! बिनधास्त खा अंडी, चिकन; कुक्कुटपालकांसह पशुसंवर्धन दक्ष  

या वेळच्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीत असलेले दोन्ही राजे भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे भाजप पक्ष म्हणून या निवडणुकीत काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार होते. दोन्ही राजांनी पक्ष म्हणूनच भूमिका घ्यावी, अशी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे; परंतु उदयनराजेंच्या परवाच्या भूमिकेवरून तसे काही घडेल याची शास्वती त्यांना वाटली नाही. त्यामुळेच पालिका निवडणुकीत पक्ष पातळीवर काय भूमिका घ्यायची याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील भाजपच्या एका नगरसेवकाच्या घरात बैठक झाली. त्यात पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काय भूमिका घ्यायची यावर चर्चा झाली. त्यात सर्वानुमते पालिका निवडणुकीत पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

उदयनराजेंची देहबोलीने कार्यकर्त्यांत मेहेरबान हाेण्याचे पसरले चैतन्य

दोन्ही राजेंच्या भूमिकेवर अवलंबून 

विशेष म्हणजे जिल्हा संपर्क प्रमुख खासदार गिरीश बापट यांनी साताऱ्यात येऊन उदयनराजेंची भेट घेतलेल्या दिवशी सायंकाळी ही बैठक झाली. त्यामुळे दोन्ही राजांना एकप्रकारे पक्षाने दिलेला हा संदेशच मानावा लागणार आहे. एकत्र या अन्यथा आम्ही विरोधात उभे ठाकणार असाच संदेश भाजपकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. अर्थातच दोन्ही राजेंच्या भूमिकेवरच ते अवलंबून असणार आहे.

चर्चाच चर्चा! कऱ्हाड बस स्थानकावर अकरा तारखेचीच चर्चा 

Edited By : Siddharth Latkar