सातारा : ‘आरोग्य’च्या रडारवर बोगस डॉक्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud doctor

सातारा : ‘आरोग्य’च्या रडारवर बोगस डॉक्टर

कऱ्हाड - तालुक्यातील दुर्गम तसेच ग्रामीण भागात कोरोना काळात भीतीच्या मानसिकतेत असणाऱ्या लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटण्याचा उद्योग बोगस डॉक्टरांनी केला. त्यांचा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारीमुळे पोलिस-आरोग्य विभागाने कारवाई केली. त्यामध्ये कोरोना काळात नारायणवाडी येथे तर सुमारे आठ महिन्यांपूर्वी उंब्रजला बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला. वर्षभराच्या कोरोना काळातच दोघांवरील कारवाईने जिल्हा हादरला. कोरोना काळात त्या कारवाया संथ होत्या. मात्र, कोरोना ओसल्यानंतर आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांवरील कारवाईचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी दोन्ही कारवायांच्या अभ्यासासह तालुक्यातील वर्षभराचा आढावाही घेतला आहे. त्यासाठी काही दिवसांत तपासणी मोहीम हाती घेतली जात आहे.

तालुक्यात अधिकृत वैद्यकीय परवाना नाही, परिचारिकेचे अधिकृत प्रशिक्षण नाही, असे असताना केवळ अनुभवाच्या जोरावर लोकांच्या जिवाशी खेळण्याचे दुकान थाटले आहे. त्यांच्या मागेही आता चौकशी लागणार आहे. डॉक्टरच्या क्लिनिकला मान्यता आहे का? याचीही चौकशी होणार आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात बोगस डॉक्टारांचा सुळसुळाट आहे. त्यांच्यावरही कारवाई होऊन पर्दाफाश करण्याचे आरोग्य विभाग त्या मोहिमेतून आखत आहे. नारायणवाडीत महिला बोगस डॉक्टरवर कोरोना काळात गुन्हा दाखल झाला. उंब्रजलाही बोगस डॉक्टरवर कारवाई झाली. दोन्ही बोगस डॉक्टरांना परिचारिकेचा अनुभव असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात आली होती. मात्र, तीही खोटी होती. त्यामुळे डॉक्टर म्हणून वावरणाऱ्यांचा सखोल तपास करण्याचे आव्हान आजही आहे. आरोग्य विभाग त्यावर कशी मात करणार, याकडे लक्ष लागून आहे. पोलिस व आरोग्य विभागाने समन्वयाने पावले टाकल्यास डॉक्टरांच्या बोगसगिरीवर नियंत्रण येणे शक्य आहे. मात्र, ते समूळ नष्ट करण्यासाठी ठोस कारवाईची गरज आहे.

बोगसगिरीचा तपास व चौकशी सरकारी पद्धतीने झाल्यास त्यावर निर्बंध ठेवणे कठीण होणार आहे. त्याचा विचार करून आरोग्य विभागालाच ठोस पावले उचलावी लागतील. तालुक्यात दुर्गम भागात बोगस डॉक्टारांची अजूनही चलती आहे. त्यांच्यावर कारवाईचे आव्हान आहे. शहरातील उपचार खर्चिक असल्याने स्थानिक तकलादू उपचार करणारी बोगसगिरी लोकांच्या जिवावर बेतणारी आहे. त्यावर उपायांची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांत किरकोळ आजार स्थानिक ओपीडीच्या आधारावर बरे झाले. मात्र, बोगसगिरींचे उपचार हे सामान्यांच्या जिवाशी खेळणारेच होते. त्याच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाला जागृतीची तर कारवाईला पोलिसांची मदत घ्यावी लागेल, तरच कारवाईचे फलित यशस्‍वी होईल.

Web Title: Bogus Doctor On Health Radar Inspection Plan In Karad Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top