पुणे- बंगळूर महामार्गावर कोल्हापूरच्या तिघांकडून साडेतीन कोटींची चांदी जप्त

सुनील शेडगे
Sunday, 25 October 2020

बोरगाव पोलिस ठाण्याच्या वतीने महामार्गावर अवैध सोन्या- चांदीच्या वाहतुकीवर वेळोवेळी कारवाई केली जाते. अलीकडच्या काळात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाचे हे मोठे यश ठरले आहे. त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

नागठाणे (जि. सातारा)  : पुणे- बंगळूर महामार्गावर येथे एका प्रवासी बसमधून पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची चांदी जप्त केली. यात सुमारे 600 किलो चांदी व पिवळ्या रंगाच्या धातूचा समावेश आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड बाजूकडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर नागठाण्यानजीक ही कारवाई करण्यात आली. पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना गोपनीय माहितीच्या आधारे एका प्रवासी बसमधून अवैधपणे चांदीची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी पहाटे कार्तिक ट्रॅव्हल्सची बस (एमएच 09 सीव्ही 1179) नागठाण्यानजीक थांबविली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवासी, चालक, वाहक यांची तपासणी केली असता पोलिसांना काहीही आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी बसची डिकी उघडून तपासणी केली. या वेळी त्यांना एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये चांदीसारख्या दिसणाऱ्या वस्तू सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी बसच्या मागील डिकीची तपासणी केली. त्यात पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये आणखी काही चांदीसारख्या दिसणाऱ्या वस्तू आढळल्या.

स्टाईल इज स्टाईल! कार्यकर्त्याची इच्छा पुरी, उदयनराजेंची बाईक सवारी! 

पोलिसांनी याबाबत चालकास विचारणा केली असता सोनसिंग परमार, अमोल भोसले, मनोजकुमार परमार या व्यक्तींची नावे सांगितली. हे तिघेही कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. संबंधितांनी या वस्तू आपल्या असल्याची कबुली दिली आहे. मात्र, त्याविषयीच्या खरेदी पावत्या वा समाधानकारक उत्तरे त्यांना देता आली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी प्रवासी बस बोरगाव पोलिस ठाण्यात आणली. तिथे या चांदीची तपासणी करण्यात आली. त्यात 591 किलो चांदी आढळून आली. या वेळी 19 किलो वजनाचे पिवळ्या धातूचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी तीन कोटी 64 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

साताऱ्याच्या राजघराण्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, उदयनराजेंचा निर्णय

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात मनोहर सुर्वे, सुनील जाधव, किरण निकम, विशाल जाधव, विजय साळुंखे, प्रकाश वाघ, राहुल भोये, उत्तम गायकवाड, चालक पवार या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांची मोठी कारवाई 

बोरगाव पोलिस ठाण्याच्या वतीने महामार्गावर अवैध सोन्या- चांदीच्या वाहतुकीवर वेळोवेळी कारवाई केली जाते. अलीकडच्या काळात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाचे हे मोठे यश ठरले आहे. त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

गुन्हेगारी माेडीत काढणे हेच माझे ध्येय : आंचल दलाल

Edited By : Siddharth Latkar 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Borgoan Police Raided Travels From Kolhapur On Pune Bangloare National Highway Satara News