मास्क घेताय...? थांबा... त्यात कोरोना विषाणू असू शकतो

Satara
Satara

कोळकी (जि. सातारा) ः कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये फलटण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी चांगले काम केलेले असताना फलटणच्या चौकाचौकांमध्ये कसलेही नियम न पाळता अवैधरीत्या मास्क विक्री सुरू असून, त्यामधून तालुक्‍यात कोरोनाची साथ वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

फलटण शहरातील पृथ्वी चौक, गिरवी नाका, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा वर्दळीच्या चौकांमध्ये काही विक्रेते रंगीबेरंगी मास्कची विक्री करीत आहेत. अशा विक्रेत्यांभोवती लोकांची मोठी गर्दी जमत आहे. प्रत्येक जण मास्क घेऊन तोंडाला लावून आरशामध्ये पाहून खरेदी करताना दिसत आहे. अशा खरेदीमध्ये पाच ते सहा तरी मास्क तोंडाला लावून पाहिले जातात. अशा वेळी जर एखादी खरेदीदार व्यक्ती जर कोरोना विषाणूची संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह झालेली असल्यास या मास्कच्या माध्यमातून क्षणभरात संक्रमण होण्यास वेळ लागणार नाही. त्याचे गंभीर परिणाम हे फलटण शहरासह तालुक्‍याला भोगावे लागतील. परिणामी फलटण विभागाचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे, फलटण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, तसेच त्यांना साथ देणाऱ्या तालुक्‍यातील इतर अधिकारी, प्रामाणिक जनतेने आजपर्यंत केलेल्या कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईला सुरुंग लागल्याशिवाय राहाणार नाही. 
फलटण शहरासह तालुक्‍याची लोकसंख्या जवळपास लाखाच्या आसपास आहे. शहराला लागून असलेल्या कोळकी, जाधववाडी व सस्तेवाडी या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत. या भागातीलही बरेचसे लोक खरेदीसाठी, कामासाठी, नोकरीनिमित्त फलटणला येतच असतात. त्यामुळे पालिकेने अशा विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सूज्ञ नागरिक करीत आहेत. 

साताऱ्यातही अशीच विक्री सुरू 

दरम्यान, सातारा शहराचे मुख्यालय असलेले बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा जिल्हा परिषद, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मुख्यालय परिसरातही आता कसलेही नियम न पाळता, कसलाही दर्जा नसलेले मास्क अवैधरीत्या रस्त्यावर विकले जात आहेत. त्यांच्याकडेही कोणत्याही यंत्रणेचे लक्ष दिसत नाही. संबंधित मास्क विक्रेत्यांना कोणीही रोखताना दिसत नाही. सातारा पालिका किंवा पोलिसांनी यात लक्ष घालून अवैधरीत्या रस्त्यावर सुरू असलेली मास्क विक्री तातडीने थांबवावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com