साप गावात पोलिसांची धडक कारवाई; बैलगाडी शर्यतीचा डाव उधळत 17 जणांवर गुन्हा

साप गावात पोलिसांची धडक कारवाई; बैलगाडी शर्यतीचा डाव उधळत 17 जणांवर गुन्हा

रहिमतपूर (जि. सातारा) : राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे, तरीही साप गावामध्ये (ता. कोरेगाव) बैलगाडी शर्यत भरल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळी वेषांतर केलेल्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व रहिमतपूर पोलिसांनी शर्यतीचा डाव उधळून लावला. जवळपास असलेल्या तीन दुचाकी, एक चारचाकी व सहा बैलांसह तीन बैलगाड्या ताब्यात घेतल्या. या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल (ता. 14) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास साप येथील खडवी नावाच्या शिवारात बैलगाडी शर्यत होणार असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचत काही पोलिस वेषांतर करून बैलगाडी शर्यत भरवलेल्या ठिकाणी आले. त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत रहिमतपूर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. बैलगाडी शर्यती सुरू होण्याच्या वेळीच सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलिसांची टीम घटनास्थळी हजर झाली. पोलिसांची गाडी बघताच बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. मोकळ्या रानमाळावर छकड्यासह बैले सैरावैरा धावू लागले, तर बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेल्या लोकांसह आयोजकांचीही पळापळ झाली. प्रसंगावधान राखून पोलिसांनी धरपकड करून शिताफीने बैलांसह तीन छकडे, तीन दुचाकी (एमएच 11 सीव्ही 6761, एमएच 12 डीआर 3901, एमएच 13 एल 0145 व चार चाकी (एमएच 11 बीएल 3144) जागीच पकडण्यात आली. मात्र, कारवाईच्या भीतीने काही बैलगाडी चालक बैलांसह छकडे घेऊन मोकळ्या माळरानाने पळून गेले. 

या प्रकरणी साप येथील जागा मालक सुनील परशुराम जाधव (वय 55), विजय अशोक कदम (30) अरविंद भगवान कदम (50), आशिष श्रीमंत जाधव (26), शुभम संजय कदम (21), अनुराग शामराव कदम (24), तर अनवडी (ता. वाई) येथील प्रसाद दत्तात्रय पवार (20), अतुल शशिकांत पिसाळ (26), अजिंक्‍य यशवंत सुळके (21), तसेच विक्रम अंकुश टिके (25, रा. कडेगाव, ता. वाई), विष्णू रामराव फडतरे (55) व प्रदीप विष्णू फडतरे (वय 29, दोघेही रा. लोणी, ता. खटाव), अर्जुन सुधीर मोरे (19) व अक्षय रवींद्र मोरे (वय 20, दोघेही रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव), विपूल दिलीप कदम (38) व हरिदास चंद्रकांत मोरे (वय 36, दोघेही रा. सासुर्वे, ता. कोरेगाव) यांच्यासह एकूण 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com