Satara News : कोरेगाव विकास आराखड्यास वाढतोय विरोध

नगरपंचायतीचा ‘डीपी’विरोधी ठराव घेण्याचा नागरिकांचा निर्धार; दोन्ही आमदारांना आवाहन करण्याचा निर्णय
Satara Municipality
Satara Municipalityesakal

कोरेगाव - नगरपंचायत प्रारूप शहर विकास आराखडा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण अथवा विशेष सभेमध्ये नामंजूर असल्याचा ठराव एकमताने करून घेण्याचा निर्धार काल रात्री येथील वेताळगल्ली- टेक परिसरातील श्री मारुती मंदिरात झालेल्या नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला.

तालुक्याला लाभलेल्या दोन्हीही आमदारांना तातडीने एकाच व्यासपीठावरून आणून त्यांना शहरावर आलेले हे विकास आराखड्याचे गंभीर संकट दूर करण्याचे आवाहन करण्याचा, तसेच आराखड्यात ज्यांच्या मालमत्तेवर आरक्षण पडलेले आहे, अशा नागरिकांनी मुदतीत रीतसर हरकत घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

सर्व स्तरातून आराखड्यास विरोध वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ किरणकुमार फाकडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात श्री. फाकडे यांनी प्रारंभी नगरपंचायतीने एकमताने प्रारूप आराखड्यास नामंजुरी दिली, तर खूपच सोपे काम होऊ शकेल. त्यानंतर मग नागरिकांना फारशी धावाधाव करावी लागणार नाही.

मात्र, तोवर निर्धारित मुदतीमध्ये नागरिकांनी रीतसर हरकत घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्या जागेवर अथवा बांधकामावर आरक्षण पडलेले आहे, ती जागा असेल तर जागेच्या सातबारा उताऱ्यावर मालक सदरी अथवा बांधकाम झालेले असेल तर बांधकामाच्या सिटी सर्व्हेच्या उताऱ्यावर असलेल्या सर्व मालकांनी आपली व्यक्तिगत हरकत घेतली पाहिजे.

या हरकतीसोबत प्रस्तावित आराखड्यातील आरक्षणाचा नकाशा, आरक्षण पडलेल्या जागेचा नकाशा, भाग (फाळणी) नकाशा, सातबारा अथवा सिटी सर्व्हेचे उतारे, मिळकतीचा फोटो, संबंधित मिळकतीवर पूर्वी काही आरक्षण होते का, तेथे बांधकाम झाले असेल तर त्या बांधकामाला परवानगी घेतला होती का? सध्या ज्यासाठी आरक्षण टाकले आहे,

ते हटवायचे झाल्यास त्याला पर्याय काय देता येऊ शकेल, याचे विवेचन, तुमच्या घरातील लोकांची संख्या, तुमची मालमत्ता संपादित झाल्यास तुम्ही भूमिहीन होत आहात काय? तुम्हाला कौटुंबिक अडचणी काय येऊ शकतात? तुमची मालमत्ता यापूर्वी सरकारी कामात कोठे संपादित झाली होती का? झाली असेल, तर त्याचे पुरावे, संबंधित नगरपंचायतीचा कर भरल्याची पावती, विजेचे बिल जोडणे आवश्यक आहे.

यात अडचण वाटल्यास प्रसंगी विधिज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र, हरकत ही परिपूर्ण असावी. बैठकीत प्रतिभाताई बर्गे, संजय पिसाळ, सम्राट बर्गे, अमरसिंह बर्गे, किशोर ना. बर्गे, किशोर रा. बर्गे, प्रीतम बर्गे, राजेश बर्गे, डॉ. गणेश होळ, हेमंत बर्गे, अमोल बर्गे, धनंजय सू. बर्गे आदींनी सूचना करत सर्वांनी एकत्र येऊन शहरावर आलेले हे संकट दूर करण्याचे आवाहन केले.

कोरेगाव नगरपंचायतीचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना प्रथमदर्शनी काही त्रुटी निदर्शनास येत आहेत. अजून त्यावर अभ्यास सुरू आहे. हा आराखडा करताना चुका झाल्याची खात्री झाल्यास हा प्रारूप आराखडाच पूर्णतः रद्द करण्यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

- किरणकुमार फाकडे, विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com