esakal | शाब्बास! गावच्या पोरांनी करुन दाखवलं; WhatsApp मधून गोळा केली 'आरोग्य'साठी लाखोंची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Health Center

शाब्बास! गावच्या पोरांनी करुन दाखवलं; WhatsApp मधून गोळा केली 'आरोग्य'साठी लाखोंची मदत

sakal_logo
By
प्रशांत गुजर

सायगाव : समाजात आज अनेक जण कोरोनाकाळात मदत करण्यासाठी पुढे येत असतात. मात्र, या महामारीवर मात करण्यासाठी आणि परिसर कोरोना मुक्त करण्यासाठी चक्क व्हाॅटसअॅप समूहाच्या माध्यमातून फक्त दोनच दिवसांत तब्बल दोन लाख सत्तर हजार रुपये जमा करून लगेच मदत करणाऱ्या या समूहाने सोशल मीडिया फक्त टाइमपास करण्याचे साधन नसून समाजाला किती उपयोगी आहे हे दाखवून देत एक आदर्श निर्माण केला आहे.

सातारा तालुक्यातील लिंब गावातील नागरिकांनी व्हाॅट्सअॅप समूहाच्या माध्यमातून जमा झालेल्या रक्कमेतून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कमतरता असणारी औषध उपलब्ध करून दिली. व्हाॅट्सअॅपवर रोज गुड मॉर्निंग, गुड नाईट अशा पद्धतीने एकमेकास अनेकजण मेसेज करत असतात आणि निव्वळ टाइमपास करतात. मात्र, लिंब येथील नागरिक, तरुण नोकरीनिमित्त बाहेर असणाऱ्या देशातील व परदेशातील नोकरदार युवकांनी तसेच ग्रामस्थांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि लिंब परिसरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहून हे सर्व रोखण्याच्या दृष्टीने, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कमतरता असणारी औषधे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपण काहीतरी करावे या उद्देशाने व्हाॅट्सअॅप समूहावर जनजागृती सुरु झाली.

कोरोनामुक्ती 88.25 टक्‍क्‍यांवर; कऱ्हाडात दाेन टक्केच बाधित

समूहावर याबाबत चर्चा सुरु झाली आणि त्यास आर्थिक पाठबळाची गरज प्रामुख्याने भासणार असल्याने फक्त दोनच दिवसांत गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून एक-एक करत या समूहातील तब्बल एकशे सत्तर जणांनी सुमारे दोन लाख सत्तर हजार रुपये जमा केले. विशेष म्हणजे माहेरवाशिन महिलांनी देखील यामध्ये आपले योगदान दिले, तर कोरोना बाधित रुग्णांनीही मोलाची मदत केली. या जमा झालेल्या रक्कमेतून लिंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक असणारी औषधे, सॅनिटायझर मशीन, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, टेम्परेचर गण, खुर्च्या, तसेच रुग्णांसाठी सावलीसाठी मंडपाची सोय करण्यात आली. तर प्रामुख्याने खऱ्या अर्थाने धोकादायक परिस्थितित काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांना मानधन दिले. या व्हाॅट्सअॅप समूहामध्ये अजूनही मदतीचा ओघ सुरुच आहे.

बेड पाहिजे, इंजेक्शन हवयं! भाजपच्या कार्यकर्त्यांना फाेन करा

या साहित्य वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, सरपंच ऍड. अनिल सोनमळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. अरुण पाटोळे, ग्रामविकासाधिकारी सुनील चिकणे उपस्थित होते. तर व्हाॅट्सअॅप समूहातील संदीप सावंत, प्रवीण सावंत, मच्छिंद्र सावंत, संजय सावंत, अशोक माने, विकास सावंत, सचिन सापते, रवींद्र कांबळे, सयाजी सावंत, दयानंद सावंत, चंद्रकांत सावंत, चंद्रकांत तोडरमल, संजय बरकडे, दीपक शिंदे यांच्यासह समूहातील सदस्य तसेच आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी फडतरे यांनी व्हाॅट्सअॅप समूहाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचे कौतुक केले.

लिंब गावातील युवकांसह ग्रामस्थांनी जत्रा साजरी न करता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी समूहाच्या माध्यमातून केलेली ही मदत खऱ्या अर्थाने आदर्शवत अशीच आहे. इतर गावांनी देखील असा आदर्श घेवून मदत करावी.

-संदीप सावंत, ग्रामस्थ लिंब

Edited By : Balkrishna Madhale

loading image