esakal | Maharashtra Lockdown : गड्या आपला गावच लई बरा!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune And Mumbai

Maharashtra Lockdown : गड्या आपला गावच लई बरा!

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनासाठी कडक निर्बंध लावून लॉकडाउन सुरू केल्याने सध्या पुणे, मुंबईतून गावाकडे येणाऱ्यांचे लोंढे वाढले आहेत. मागील लॉकडाउनवेळी जिल्हा बंदी असल्याने परवानगीशिवाय प्रवेश नव्हता; पण आताच्या लॉकडाउनमध्ये जिल्हा बंदी नसल्याने मुंबई, पुण्यासह इतर राज्यांतून जिल्ह्यात घरी येणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या सर्वांकडे कोणतीही चाचणी केलेल्याचा पुरावा नाही. परिणामी, जिल्ह्यात वाढलेली कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता बाहेरच्या जिल्ह्यातून स्वगृही येणाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मिनी लॉकडाउननंतर आता राज्य सरकारने आजपासून (ता. 15) पुन्हा एकदा राज्यभर लॉकडाउन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे एक मेपर्यंत अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही बंद राहणार आहे. कामगार, नोकरी व व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसह बाहेरच्या जिल्ह्यात व राज्यात असलेल्या सातारकरांनी पुन्हा स्वगृही येण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन- चार दिवसांत मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लोंढे जिल्ह्यात येऊ लागले आहेत. त्याचे सर्वाधिक प्रमाण कऱ्हाड, सातारा, जावळी, पाटण, तसेच वाई व माण, खटाव तालुक्‍यांत आहे. मागील वर्षीच्या लॉकडाउन वेळी जिल्हा बंदी असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात येताना नागरिकांना परवानगी घेऊनच यावे लागत होते. गावात आल्यावर त्यांच्यावर 14 दिवस होम क्वारंटाइन करून लक्ष ठेवले जात होते. यामागे कोरोनाचा संसर्ग वाढू नये हा हेतू होता; पण सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये जिल्हा बंदी नसल्याने नागरिकांनी गावाकडे जाण्यावर भर दिला आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असतानाच बाहेरच्या जिल्ह्यातून व राज्यातून स्वगृही येणाऱ्या या नागरिकांतूनही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. किमान बाहेरून गावात आलेल्या प्रत्येकाची नोंद घेऊन त्यांच्यावर कोरोनासदृश लक्षणे जाणवतात का, यावर लक्ष ठेवणेही गरजेचे बनले आहे. अन्यथा, अद्याप कोरोनाचा संसर्ग न पोचलेल्या किंवा ज्या गावांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, अशा गावात पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गावपातळीवर असलेल्या कृती समितीवर जबाबदारी देऊन बाहेरून आलेल्यांची किमान नोंद ठेवणे, तसेच त्यांची चाचणी करण्यावर भर देणे गरजेचे आहे. अन्यथा, पुन्हा एकदा ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती आहे.

हे पण वाचा- गोंदवल्यात 'राम नवमी'च्या थेट प्रक्षेपणावर कोरोना 'संकट'

खबदारी घ्या; कोरोना संसर्ग टाळा!

नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरच्या जिल्ह्यात किंवा राज्यात असलेल्यांनी कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये स्वगृही येण्यास हरकत नाही; पण त्यांनी आपण कोरोनाबाधित नाही, याची खबदारी घेतली तरच आपल्या घरातील इतर व्यक्तींना संसर्ग होऊ शकणार नाही. ही जबाबदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे अन्यथा कोरोनचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Edited By : Balkrishna Madhale