esakal | ढेबेवाडीत ऑन द स्पॉट Covid Test; रिकाम टेकड्यांना रोखण्यासाठी तालुक्यात मोहीम

बोलून बातमी शोधा

Covid Test

ढेबेवाडीत ऑन द स्पॉट Covid Test; रिकाम टेकड्यांना रोखण्यासाठी तालुक्यात मोहीम

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : विनाकारण फिरणाऱ्यांना अडवून त्यांची जागेवरच कोरोना चाचणी करण्याची मोहीम नुकतीच येथे सुरू होताच अवघ्या दोन तासांतच रिकाम टेकड्यांची लुडबूड थांबून ढेबेवाडीसह परिसरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले. स्थानिक ग्रामपंचायत, आरोग्य व महसूल विभागाच्या मदतीने येथील पोलिसांनी हाती घेतलेल्या या मोहिमेत 63 जणांची रस्त्यावरच रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी चौघे बाधित आढळले. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे.

बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने ढेबेवाडी व तळमावले या प्रमुख बाजारपेठेत येत्या 30 तारखेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय व बॅंकिंग सेवा वगळता बाजारपेठेतील उर्वरित दुकानांची शटर्स बंद असली, तरी अनेकांची बिनकामाची लुडबूड डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेत त्यास प्रत्यक्षात सुरुवातही केली.

..तर जिल्ह्यांतर्गत फिरताच येणार नाही; शासनाकडून E-pass सक्तीचा!

येथील बस स्थानक चौकात दोन तासांत पोलिसांनी 63 जणांना अडवून आरोग्य यंत्रणेमार्फत त्यांची जागेवरच कोविड टेस्ट केली. त्यामध्ये चौघे पॉझिटिव्ह आढळले. मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, सरपंच अमोल पाटील, विजय विगावे, पोलिस पाटील विजय लोहार उपस्थित होते. सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील जाधव, डॉ. कोमल लोकरे, डॉ. स्वप्नील सुतार, डॉ. बंडू घोडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहिमेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांना स्पष्ट आदेश

आम्ही गावोगावी जाऊन जनजागृती करत आहोतच, मात्र विनाकारण फिरणाऱ्यांवर केवळ कारवाई न करता त्यांचे ऑन द स्पॉट टेस्टिंग सुरू केले आहे. परिसरातील कोणत्याही रस्त्यावर अचानक ही मोहीम राबविणार आहोत, त्यामुळे सावधान.

-संतोष पवार, सहायक पोलिस निरीक्षक ढेबेवाडी

Edited By : Balkrishna Madhale