'मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांच्या सहकार्याने हुतात्मा ओंबळेंच्या स्मारकासाठी प्रयत्न करू'

संदीप गाडवे
Thursday, 26 November 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने हुतात्मा ओंबळे यांचे स्मारक पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हाप्रमुख घाडगे यांनी सांगितले.

केळघर (जि. सातारा) : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडून हौतात्म्य पत्करणाऱ्या केडंबे (ता. जावळी) येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून स्मारकाचे काम लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली. 

केडंबे येथे आज हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नेहरु युवा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ व एकनाथ ओंबळे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तहसीलदार पोळ बोलत होते. या वेळी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, पोलीस उपनिरीक्षक रोकडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख एस. एस. पार्टे गुरुजी, शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, जावळी तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे, वीज वितरणचे शाखा अभियंता राहुल कवठे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत गावडे, सरपंच वैशाली ओंबळे, उपसरपंच प्रकाश ओंबळे, करहरचे सरपंच दत्तात्रय यादव, नितीन गोळे, श्रमिक संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे, मुख्याध्यापक सुरेश मोरे, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक शंकर जांभळे , तलाठी मकरध्वज डोईफोडे, ग्रामसेवक अमोल गायकवाड, बंडोपंत ओंबळे, चंद्रकांत ओंबळे ,जगन्नाथ जाधव,हुतात्मा ओंबळे यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. श्री.बुद्धे म्हणाले,""हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाची फाईल धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून आता मंत्रालयात आहे. त्यामुळे काम लवकरच मार्गी लागेल.'' 

अजमल कसाबला जिवंत पकडणा-या तुकाराम ओंबळेंचे स्मारक आजही दुर्लक्षितच

जिल्हाप्रमुख घाडगे यांनी स्मारकासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी एकनाथ ओंबळे मित्र मंडळाच्या वतीने केडंबे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करणेत आले. आदिनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक केले.एकनाथ ओंबळे यांनी आभार मानले. बळवंत पाडळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी नेहरु युवा मंडळ,ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens Paid Homage To Police Tukaram Ombale At Kedambe Satara News