esakal | तांबवेकरांनी करुन दाखवलंच! भावकीचे वाद, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कोरोनाविरुद्ध 'एकजूट'
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Care

तांबवेकरांनी करुन दाखवलंच! भावकीचे वाद, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कोरोनाविरुद्ध 'एकजूट'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फलटण शहर (सातारा) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रामुख्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण करणारा ठरत आहे. या स्थितीत खालची आळी, वरची आळी, मधली आळी यासह सर्व मतभेद, भावकीचे वाद, पक्षीय राजकारण सारे बाजूला ठेवून संपूर्ण गाव कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक होत असल्याचा अनुभव तांबवे (ता. फलटण) येथे कोरोना केअर सेंटर उभारण्याच्या संकल्पनेतून आला. या संदर्भात निर्णय होताच काही तासांत लोकवर्गणीतून लाखो रुपये जमा झाले आणि कोरोना केअर सेंटर उभे राहिलेही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण एकत्र आले. कोरोनाचा पराभव अटळ असल्याचे लक्षात आल्यावर तरुणांनी त्यासंबंधी प्रस्ताव समोर ठेवताच गावातील अबालवृद्ध एकत्र आले. काही तासांत कोरोना केअर सेंटर उभारण्याचा निर्णय झाला आणि प्रत्यक्षात कोरोना केअर सेंटर उभे राहिलेही. आता कोरोना हद्दपार करणारच, असा निर्धार सर्व ग्रामस्थांनी एकसुरात केला आहे. कोरोना महामारीचे संकट परतवून लावण्यासाठी सर्व तांबवेकरांनी एकत्र येऊन काही तासांत अडीच लाख रुपये लोकवर्गणीतून जमा करून कोविड केअर सेंटरसाठी लागणारी सर्व औषधे, 25 बेड, सॅनिटायझर, दोन हजार मास्क, ऑक्‍सिमीटर इत्यादी साहित्य उपलब्ध करून ग्रामस्थांसाठी गावातच कोविड केअर सेंटर उभे केले.

एकदम झक्कास! दुर्गम उधावण्यात दातृत्वाच्या हातांनी साकारली 'संगणक दुनिया'

त्यासाठी आरोग्य सेवक, ग्रामपंचायत, विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुण तसेच शासकीय अधिकाऱ्यांची साथ आणि मार्गदर्शन लाभल्याने अल्पावधीत कोरोना केअर सेंटर उभे राहिले. कोरोना केअर सेंटर उभे राहिल्यानंतर ते पुढे सुरू ठेवण्यासाठी, तेथील दाखल रुग्णांसाठी नाश्‍ता, जेवण, पाण्यासाठी फिल्टर तसेच अंघोळीसाठी गरम पाणी आदी सुविधा तसेच या सेंटरसाठी वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ व अन्य साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावामध्ये प्रत्येक दोन दिवसाला सॅनिटायझर फवारणी होत आहे.

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top