Satara News : कराचीतील मराठी बांधवांशी जोडा ऋणानुबंध

Satara News : कराचीतील मराठी बांधवांशी जोडा ऋणानुबंध

भेटवस्तू पाठवण्याचा उपक्रम; मराठी भाषा दिनानिमित्त आवाहन

सातारा : थेट कराची पाकिस्तानच्या भूमीत वर्षानुवर्षे राहणारी अनेक महाराष्ट्रीय कुटुंबे मराठीचा अभिमान उराशी बाळगून आहेत. या कुटुंबातील उर्दू व इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना मराठीची गोडी लागावी,

मराठी संस्कृतीशी त्यांची नाळ घट्ट व्हावी, महाराष्ट्राबद्दल अभिमान वाटत राहील, अशा भेटवस्तू पाठवाव्यात, असे आवाहन येथील स्वप्न स्टडीज ऑनलाइन एज्युकेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे कराचीतील मराठी कुटुंबांच्या संपर्कात असलेल्या दिलीप आणि स्वप्नील पुराणिक यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त केले आहे.

येथील श्री. पुराणिक कराचीतील मराठी माणसांच्या सतत संपर्कात आहेत. मातृभूमी, मातृभाषा या विषयाची त्यांची कळकळ जाणून आहेत. पाकिस्तानमध्ये मराठी परंपरा जपणारी अनेक कुटुंबे आहेत. भोसले, गायकवाड, जगताप, दुपटे अशा अनेक आडनावांची कुटुंबे कराचीत राहतात.

वर्षानुवर्षे त्यांचा मराठी संस्कृती, मराठी भाषेशी अजिबात घनिष्ठ संबंध आलेला नाही. उर्दू व इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या त्यांच्या मुलांनाही मराठी भाषेबद्दल उत्सुकता आहे. इच्छा असूनही पाकिस्तानातून अनेक मुले व त्यांचे पालक दोन्ही देशांतील संबंध आणि पासपोर्ट, व्हिसाच्या अडचणींमुळे भारतात पोचू शकत नाहीत अन् आपणही त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही.

कराचीतील ही मराठी माणसे आपली भाषा, संस्कृती विविध कार्यक्रमांनी टिकविण्यासाठी धडपडत असतात. आपल्या मुलांनाही मराठी, संस्कृती भाषेची सतत ओढ राहावी, ही तेथील पालकांची इच्छा आहे. या त्यांच्या इच्छेला बळ देण्याची आवश्यकता आहे, असे मत श्री. पुराणिक यांनी व्यक्त केले.

कराचीतील या कुटुंब व मुलांना आपली मराठी भाषा, संस्कृतीविषयी जास्त आवड निर्माण होईल, महाराष्ट्राबद्दल अभिमान वाटेल, अशा भेटवस्तू मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पाठविल्यास खूप मदत होईल. असा विचार करून पुराणिक यांनी या मुलांना भेटवस्तू पाठविण्याचे आवाहन केले आहे.

येथे साधा संपर्क...

कराचीतील मुलांसाठी पाठवली जाणारी भेटवस्तू ही त्या मराठी मुलांना मराठी भाषेबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल प्रेम वाटावे, महाराष्ट्राबद्दल अभिमान वाटावा, अशी असावी असे दिलीप पुराणिक यांनी सांगितले. यातून तेथील शालेय मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

अशी भेटवस्तू असल्यास त्याचा फायदा होईल. वेगवेगळ्या देशात असलेली महाराष्ट्र मंडळे, मराठी उद्योजक, विविध व्यक्तींसह विविध संस्थाही यात सहभागी होऊ शकतात. कराचीतील मराठी कुटुंबाचे पत्ते मिळवण्यासाठी ७६२०९२१०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

कराचीतील या मुलांसाठी ज्यांना भेटवस्तू देण्याची इच्छा आहे. त्यांनी ही वस्तू आमच्याकडे पाठवायची नाही. ती थेट कराचीत पाठवायची आहे. त्यासाठी कराचीतील मराठी कुटुंबांचे पत्ते देऊ. कुरिअरद्वारे ती भेटवस्तू पाठवावी.

- दिलीप पुराणिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com