आपल्याच माणसांत राहिल्याच्या भावनेने मनावरचे नैराश्‍यही दूर झाले : शुभांगी पवार

सुनील शेडगे
Monday, 5 October 2020

येत्या काळातही प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्‍यक वाटते. सामाजिक अंतर, मास्कचा वापर, शारीरिक व्यायाम या गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटतात अशी भावना काेराेनामुक्त झालेल्या सातारा पाेलिस दलातील शुभांगी उद्धव पवार यांनी व्यक्त केली.

नागठाणे (जि. सातारा) : पोलिस खात्यातील नोकरी म्हणजे सततची धावपळ, ताणतणावाचा सामना. तरीदेखील कोविड काळात गेले सहा महिने आम्ही अगदी प्रामाणिकपणे आमचे कर्तव्य बजावित होतो. शासकीय आदेशांची अंमलबजावणी करत होतो. दिवसेंदिवस जशी रुग्णांची संख्या वाढायला लागली, तशी मनातली चिंताही वाढत गेली. 

अशातच नकळतपणे कोरोनाची लागण झाली. 21 सप्टेंबर रोजी दिवसभर अस्वस्थ वाटू लागले. पाय अन्‌ अंग दुखायला लागले. थोडी कणकणही जाणवायला लागली. थंडी, ताप, खोकला, तोंडाला चव नसणे, वास न येणे, धाप लागणे ही लक्षणेही दिसू लागली. त्यातच मला मधुमेहाची व्याधी. त्यामुळे काळजी वाटू लागली. फॅमिली डॉक्‍टरांकडून प्राथमिक औषधोपचार झाले. संसर्ग वाढू नये म्हणून रात्रभर घरात विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला. मुळात घरात वयोवृद्ध सासू-सासरे अन्‌ लहान मुले. मग दुसऱ्या दिवशी ऍन्टीजेन चाचणी केली. अपेक्षेप्रमाणे ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर लगेचच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून साकारलेले पोलिस कोविड सेंटर गाठले. 

संसर्गाच्या काळात पैशापैक्षा माणुसकी ठरतीय श्रेष्ठ : डॉ. प्रवीण चव्हाण

जवळपास दहा दिवस तिथे उपचार घेतले. अर्थात तिथल्या कौटुंबिक वातावरणामुळे निम्मा आजार बरा झाला. आपल्याच माणसांत राहिल्याच्या भावनेने मनावरचे नैराश्‍यही दूर झाले. तिथली व्यवस्था, सोयी-सुविधाही उत्तम होत्या. याबाबत सातपुते यांना जितके धन्यवाद द्यावे, तितके थोडेच होते. या काळात माझ्यासोबत खंबीरपणे उभे असलेले माझे कुटुंबिय, नातेवाईक, पोलिस खात्यातले वरिष्ठ अधिकारी, माझे सहकारी यांनी मला मानसिक आधार दिला. मोलाची साथ दिली.

पार्लेतील कोविड सेंटरमध्ये आता औषधोपचारही!

येत्या काळातही प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्‍यक वाटते. सामाजिक अंतर, मास्कचा वापर, शारीरिक व्यायाम या गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटतात अशी भावना काेराेनामुक्त झालेल्या सातारा पाेलिस दलातील शुभांगी उद्धव पवार यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constable Shubhangi Pawar Expressed Views After Recovered From Covid 19 Satara News