esakal | Corona Helpline म्हणजे 'भरवशाच्या म्हशीला टोणगा'; बेडसाठी करावी लागतीय वणवण

बोलून बातमी शोधा

Corona Helpline
Corona Helpline म्हणजे 'भरवशाच्या म्हशीला टोणगा'; बेडसाठी करावी लागतीय वणवण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाबाधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना बेड व अन्य बाबतीत मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रशासनाने 1077 या हेल्पलाइनची सुविधा निर्माण केली आहे. परंतु, मोबाईलवरून या हेल्पलाइनशी संपर्कच होत नसल्यामुळे बेडच्या उपलब्धतेसाठी अत्यवस्थ रुग्णाला सोबत घेऊन नातेवाईकांना रात्री-अपरात्रीही रुग्णालयांच्या बाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. बेडच्या शोधासाठी वणवण करावी लागत आहे. कोरोनाशी मुकाबला करणे नागरिकांना सुसह्य होईल, अशी उपयोगी यंत्रणा उभी राहील याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्‍यक आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाबाधितांचा आजचा आकडा एक हजार 800 रुग्णांवर गेला आहे. आजवरचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक गावात, प्रत्येक वॉर्डात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या सर्व परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे. बेडची उपलब्धता वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु, ही उपाययोजना वाढत्या रुग्णसंख्येमुळे तोकडी पडत आहे. शासकीयच काय खासगी रुग्णालयांमध्येही बेड उपलब्ध होत नाहीत. खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध झाला तर, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आवश्‍यक त्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाला उपचार द्यायचे कसे, असा प्रश्‍न बाधितांच्या नातेवाईकांच्या मनात निर्माण होत आहे. त्यातून हतबलता निर्माण होत आहे.

नाशिक काय घेऊन बसलात, इथं 66 रुग्णांचा जीव धाेक्यात आला हाेता

नागरिकांची या हतबलतेमधून सुटका व्हावी, यासाठी प्रशासन काहीच करत नाही असे नाही. नागरिकांना घरबसल्या कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती होण्यासाठी प्रशासनाने दोन उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये ऑनलाइन साईटचाही समावेश आहे. मात्र, ती "अपडेट' नसल्याने रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकाला बेडची "लाइव्ह' स्थिती कळत नाही. या उपाययोजनेतून माहिती न मिळाल्यास प्रशासनाच्या 1077 या हेल्पलाइनचा दुसरा पर्याय नागरिकांसमोर आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना कोरोनात होम आयसोलेशनमध्ये घ्यायची काळजी, बेडची उपलब्धता, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची आवश्‍यकता या सर्वांबाबत मार्गदर्शन मिळण्याची सुविधा केली आहे.

Corona Virus : कोरोनाच्या धास्तीने नागठाण्यात दहा दिवसांचा कर्फ्यू

परंतु, गरज असेल तेव्हा मोबाईलवरून फोन केल्यास हा क्रमांक अस्तित्वात नाही, असेच उत्तर रुग्णांच्या नातेवाईकांना ऐकायला मिळत आहे. लॅण्डलाइनवरून या क्रमांकावर संपर्क होतोय. परंतु, अशा फोनचे प्रमाण आता कमी आहे. त्याचबरोबर बाहेर असल्यावर मोबाईल हाच नागरिकांसमोर पर्याय असतो. त्यामुळे अत्यवस्थ किंवा उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना सोबत घेऊन नातेवाईकांना रुग्णालयाची दारे पुजावी लागत आहेत. अनेकांना बेडसाठी रुग्णालयाबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे "भरवशाच्या म्हशीला टोणगा' अशी या हेल्पलाइनची अवस्था झाली आहे.

कोणत्याही मोबाईलवरून 24 तास संपर्क व्हावा

कोरोनाबाधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी कोणत्याही मोबाईलवरून 24 तास ही हेल्पलाइन नागरिकांसाठी उपलब्ध होईल, अशी उपाययोजना प्रशासनाने तातडीने करणे आवश्‍यक आहे, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांमधून होताना दिसत आहे.

Edited By : Balkrishna Madhale