esakal | अधिकाऱ्यांनो, माणुसकीच्या नात्याने लक्ष द्या; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर आमदार गोरेंची नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

Jayakumar Gore

अधिकाऱ्यांनो, माणुसकीच्या नात्याने लक्ष द्या; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर आमदार गोरेंची नाराजी

sakal_logo
By
रूपेश कदम

दहिवडी (सातारा) : सध्याच्या आणीबाणीच्या काळात सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या नात्याने दक्ष राहून लक्ष देऊन काम करावे, अशी अपेक्षा आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. या प्रतिकूल आणि बिकट परिस्थितीत सुरू असलेल्या प्रशासनाचा हलगर्जीपणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

येथील विश्रामगृहात आयोजित माण आणि खटाव तालुक्‍यांच्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार बाई माने व किरण जमदाडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील व रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, डॉ. लक्ष्मण कोडलकर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, "कोरोनामुळे माण व खटावमधील रुग्णांना वैद्यकीय उपचार, ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी नातेवाईकांना जिवाच्या आकांताने धावाधाव करावी लागत आहे. मात्र, दोन्ही तालुक्‍यांत सुरू असलेल्या कोरोना उपचार केंद्रांमध्ये रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत की नाही? वेळेवर आणि पुरेसा ऑक्‍सिजन पुरवठा होतोय की नाही? अत्यावश्‍यक औषधे आणि इंजेक्‍शन्स दिली जातात की नाही? याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. रुग्णांना वेळेवर बेड्‌स उपलब्ध करून देण्याकडेही लक्ष दिले जात नाही.''

सर्वाधिक रुग्णसंख्येने धास्तावले सातारकर; लाॅकडाउनच्या दिशेने पावले

तसेच, वीज वितरणचा बेजबाबदार कारभार अत्यवस्थ रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता आहे. वारंवार लाइट जाण्यामुळे ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटरचे काम ठप्प होत आहे. ऑक्‍सिजन संपल्याने काही रुग्णांचा जीव धोक्‍यात आला होता. आम्ही तातडीने मदत केल्याने एक कटू प्रसंग टळला असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "शासकीय असो किंवा खासगी असो, प्रत्येक उपचार केंद्राला ऑक्‍सिजन पुरविण्याची जबाबदारी शासनाने पेलली पाहिजे. पोलिसांनी ऑक्‍सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना सुरक्षा दिली पाहिजे. ऑक्‍सिजन वाहतूक करणाऱ्या चालकांना दिलेल्या सूचनांचे पालन होत नाही. मतदारसंघातील सर्वच उपचार केंद्रांमधील व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन आणि सर्वसाधारण बेड्‌सची माहिती लोकांना मिळण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू करा.'' डॉ. देशमुख यांनी ऑक्‍सिजन वाहतूक तसेच इतर लागेल त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्याची ग्वाही दिली.

तेरे जैसा यार कहाँ! वडुजात मित्राच्या मदतीला धावली 'मैत्री'

Edited By : Balkrishna Madhale

loading image