मसूर आरोग्य केंद्रात मोठा भ्रष्टाचार?; लसीकरणावरुन डॉक्‍टर धारेवर!

मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या कामकाजात अनागोंदी कारभार सुरू असल्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
Vaccination
Vaccinationesakal

मसूर (सातारा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Masur Primary Health Center) लसीकरणाच्या (Covid Vaccination) कामकाजात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. लसीकरणासाठी रांगेत उभे असलेल्यांना सोडून आतल्या दाराने काहींना लसीकरण केल्याचे समोर आल्याने त्यांचा पारा चढला होता. (Corruption In Vaccination At Masur Primary Health Center Satara News)

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत निगडी, किवळ, शामगाव, शिरवडे, कोपर्डे हवेली, वडोली निळेश्वर उपकेंद्रात लसीकरणाची सुविधा करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रावरील ताण कमी होईल. मात्र, आरोग्य केंद्रातच लसीकरणासाठी गर्दी केली जात आहे. उपकेंद्रांतर्गत लोकांनी लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात यावे लागते. त्यातच कोविड रुग्णांची तपासणी रोज सुरू असते. इतर उपचारासाठी देखील रुग्ण तपासणीसाठी आरोग्य केंद्रात येतात. लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा लागतात. लसीकरण नियमानुसार होत नाही. लोकांना टोकन दिले जात नाही, त्यांची नोंद केली जात नाही.

नंबरप्रमाणे लसीकरण न करता ओळखीच्यांना आतल्या दाराने लसीकरण केले जाते. इतरांना मात्र उन्हात रांगेत ताटकळत बसावे लागते. त्या दिवशी लस न मिळाल्याने त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी आरोग्य केंद्रात यावे लागते. हा प्रकार कळताच रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष म्हणून मी आरोग्य केंद्रात डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना कडक भाषेत जाब विचारला. आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र व 23 गावे आहेत. या गावातल्या लोकांना नियमानुसार रोटेशन प्रमाणे, लसीकरण करावे अशा सूचना दिल्या आहेत, असे थोरात यांनी सांगितले.

निवास थोरात, कार्यकर्त्यांचा प्रकार निंदनीय

मसूर : प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण नियोजनबद्ध सुरू होते. मात्र, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोपर्डेतील लोकांनाच पहिल्यांदा लसीकरण करावे, अशी मागणी करीत लसीकरणाच्या शासकीय कामात अडथळा आणला. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना एकेरी भाषा वापरत गोंधळ घातला. या निंदनीय प्रकाराचा आणि सदस्य थोरात व कार्यकर्त्यांचा निषेध करीत आहोत, अशी माहिती सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदस्य रमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते कादर पिरजादे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे व प्रकाश माळी, विकास पाटोळे उपस्थित होते. सरपंच दीक्षित म्हणाले, "आरोग्य केंद्रात नियोजनानुसार लसीकरण सुरू होते. असे असताना जिल्हा परिषद सदस्य थोरात व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोपर्डे हवेलीच्या ग्रामस्थांनाच पहिल्यांदा लसीकरण करावे, अशी मागणी करत गोंधळ घातला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांना एकेरी व अर्वाच्च भाषा वापरत धमकावले. लसीकरण बंद पाडले. कर्मचाऱ्यांत दहशत निर्माण केली. लोकप्रतिनिधी व रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षांनीच गोंधळ घालणे निंदनीय आहे. या प्रकाराचा ग्रामस्थांतर्फे जाहीर निषेध करीत आहोत.

डॉक्‍टर गेले वैद्यकीय रजेवर

आरोग्य केंद्रात नियोजनानुसार व वरिष्ठांच्या आदेशानुसार लसीकरण सुरू होते. जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लसीकरण कोणाच्या परवानगीने सुरू केले, असे धमकावत एकेरी भाषा वापरत लसीकरण बंद पाडले. जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासनाकडे त्यांनी तक्रार करायला हवी होती. या प्रकारामुळे प्रकृती अस्वस्थेमुळे मी वैद्यकीय रजेवर जात असून, त्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना कळवल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी सांगितले.

Corruption In Vaccination At Masur Primary Health Center Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com