esakal | Video पाहा : संप मिटला; रेशनिंगचे माेफत धान्य वाटप सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Ration

Video पाहा : संप मिटला; रेशनिंगचे माेफत धान्य वाटप सुरु

sakal_logo
By
सिध्दार्थ लाटकर, हेमंत पवार

सातारा : कोरोनाच्या (coronavirus) संकटामुळे व्यवसाय ठप्प झालेले आहेत. या संकटात मदत म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत धान्य (free foodgrains) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी सातारा शहरात मोफत धान्य वितरणास आज (शुक्रवार) प्रारंभ झालेला आहे. satara marathi news ration free foodgrains

कोरोनामुळे स्वस्त धान्य दुकानदारांच्या अंगठ्यानेच शिधापत्रिकाधारकांना रेशनिंगच्या धान्याचे वाटप व्हावे, ही दुकानदारांची मागणी अखेर मार्गी लागली आहे. पुरवठा विभागाने त्यासंदर्भातील निर्णय नुकताच घेतला आहे. त्याचा विचार करून स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने धान्य वाटप करण्यास प्रारंभ केला आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा विचार करून शासनाने धान्य दुकानदारांच्या अंगठ्यावर धान्य देण्याची परवानगी द्यावी, धान्य दुकानदारांचे कमिशन तातडीने अदा करावे, धान्य दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर, विजय गुप्ता, नितीन पेंटर यांच्या नेतृत्वाखाली एक मेपासून राज्यातील सरकारमान्य स्वस्त दुकानदारांचा संप सुरू केला होता.

सातारा जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1794 दुकानदार संपात सहभागी झाले होते. मागण्यांसदर्भात शासन पातळीवर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर पुरवठा विभागाने आता सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या अंगठ्यानेच शिधापत्रिकाधारकांना रेशनिंगच्या धान्याचे वाटप करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दुकानदार या कोरोनाच्या संकट काळात सुरक्षित होणार आहेत.

हेही वाचा: पीपीई किटचे बील 50 हजार रुपये; ऑडिट यंत्रणा ठरतेय कुचकामी

त्याचबरोबर दुकानदारांच्या कमिशनचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याने महाराष्ट्र दिनापासून फेडरेशनच्या नेतृत्वाखाली बंद असलेले धान्य वाटप ग्राहकांच्या हिताचा विचार करुन पूर्ववत सुरू केले असल्याचे जिल्हाध्यक्ष अशाेकराव पाटील यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाच्या कालावधीत शिधापत्रिकाधारकांसाठी मोफत धान्य देण्याचा निर्णय एप्रिल महिन्यात घेतला होता. परंतु एप्रिल महिना संपत आल्यामुळे हा गहू आणि तांदूळ मे महिन्यामध्ये वितरण सुरू करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने मे महिन्यात प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे.

याशिवाय, केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत मे आणि जून या दोन महिन्यात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत वितरित करण्यात येणार आहे. याबराेबरच शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याचा गहू तीन रुपये किलो आणि तांदूळ दोन रुपये दराने देण्यात येणार आहे असे पूरवठा विभागातून जिल्हा पूरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी नमूद केले.

हेही वाचा: अमर्यादित डेटा हवाय? बीएसएनएलच्या योजनांबद्दल जाणून घ्या

ब्लाॅग वाचा

loading image