सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार महिलेच्या अंगलट; न्यायालयाने शिकवली अद्दल!

भद्रेश भाटे
Tuesday, 12 January 2021

महिलेने दिलेली तक्रार आणि सत्य परिस्थिती यामध्ये तफावत असल्याने पोलिसांनी या प्रकरणात "ब' नावाने समरी वाई न्यायालयात दाखल केली. त्यानुसार महिलेने दिलेली तक्रार चुकीची आणि द्वेषापोटी केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने न्यायालयाने बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे वाई पोलिस आता तपास करत आहेत अशी माहिती अजय कुमार बन्सल (पोलिस अधीक्षक) यांनी दिली.

वाई (जि. सातारा) : सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करून दोघांना गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे वाई न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले. त्याप्रमाणे वाई पोलिस आवश्यक ती कार्यवाही करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

पाचगणी येथील हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोघांनी पुण्याहून पाचगणीला जाताना 27 जुलै 2019 रोजी पसरणी घाटात रेशीम केंद्राजवळ निर्जन रस्त्यावर मोटारीत सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार 18 जानेवारी 2020 रोजी एका महिलेने वाई पोलिसात नोंदविली होती. त्याच्या तपासादरम्यान पोलिसांना संशयितांपैकी एक जण गुन्ह्याच्या दिवशी भारताबाहेर होता, तर दुसरा पुण्यात होता. तसेच ज्या मोटारीमध्ये बलात्कार केल्याचे महिलेने सांगितले, ती मोटार गुन्ह्याच्या एक वर्ष आधी विकली होती. गुन्ह्याच्या दिवशी ही गाडी नांदेडमध्ये असल्याची माहिती तपासात समोर आली. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुरेसा सबळ पुरावा न मिळाल्याने नियमानुसार "बी' सारांश अहवाल न्यायालयात दाखल केला. तक्रारदार महिलेने दाखल केलेला गुन्हा चुकीचा व द्वेषपूर्ण असल्याचा निष्कर्ष तपास अधिकारी यांनी काढून अंतिम अहवाल सादर केला. त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या बी-सारांश अहवालाला महिलेने विरोध दर्शविला व एफआयआरमध्ये तिने केलेल्या तक्रारींचा पुनरुच्चार केला.

राष्ट्रीय युवक दिन : विवेकानंदांनी शिकवलेले रुग्णसेवेतील अध्यात्म

त्यावर न्यायालयाने राज्य गुन्हे अन्वेषण अहवाल आणि परदेशीय प्रादेशिक नोंदणी कार्यालय, मुंबईच्या अहवालाच्या आधारे संशयितांपैकी एक जण परदेशात व एक जण पुण्यात असल्याचा पोलिसांनी सादर केलेला पुरावा व "बी'सारांश अहवाल मान्य केला. दोन पुरुषांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा खोटा खटला दाखल केल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर न्यायालयाने खोटा गुन्हा दाखल करून, बनावट पुरावा देणे, खोटी विधाने व घोषणापत्र करणे, या अंतर्गत पोलिसांना स्वतंत्रपणे कायदेशीर कारवाई करण्याची मुभा असल्याचे मत व्यक्त करून महिलेविरोधात गुन्हा नोदविण्याचे निर्देश न्या. व्ही. एन. गिरवलकर यांनी दिले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी केला. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले. 

मी जीव देऊन तुम्हाला कामाला लावतो, असे म्हणत संशयिताने पाेलिसांसमाेर आपटले डाेके 

महिलेने दिलेली तक्रार आणि सत्य परिस्थिती यामध्ये तफावत असल्याने पोलिसांनी या प्रकरणात "ब' नावाने समरी वाई न्यायालयात दाखल केली. त्यानुसार महिलेने दिलेली तक्रार चुकीची आणि द्वेषापोटी केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने न्यायालयाने बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे वाई पोलिस आता तपास करत आहेत. 

- अजय कुमार बन्सल, पोलिस अधीक्षक, सातारा.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court Order Wai Police To File Charge Against Women False Complaint Satara Crime News