esakal | सकाळी अकरानंतर किराणा मालासह दारु घरपाेच मिळेल; वाचा नवा आदेश

बोलून बातमी शोधा

Shekhar Singh

सकाळी अकरानंतर किराणा मालासह दारु घरपाेच मिळेल; वाचा नवा आदेश

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुकानांच्या वेळा बदलून सकाळी सात ते 11 अशी करण्यात आली आहे. घरपोच सुविधा सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत देता येणार आहे. सर्व मेडिकलची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी आठ या वेळेत सुरू राहणार आहेत. याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

कोरोना संसर्ग वाढल्यामुळे साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाउन अधिक कडक केले आहे. त्यानुसार दुकानांच्या वेळेत जिल्हाधिकाऱ्यांनी बदल केले आहेत. यामध्ये सर्व किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी व मिठाईची दुकाने, तसेच सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या विक्रीची दुकाने, मटण, चिकन, मासे, अंडी विक्रीची दुकाने, रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने, कृषी अवजारे, शेतीशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्याच्या खाद्यपदार्थांच्या विक्रीची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्ती व संस्थांसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने सकाळी सात ते 11 या वेळेतच सुरू ठेवता येणार आहेत.

या दुकानांनी घरपोच सुविधा देण्यासाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत परवानगी असेल. मेडिकलची दुकाने सकाळी सात ते रात्री आठ यावेळेतच सुरू राहतील. हॉस्पिटलमधील मेडिकलची दुकाने पूर्ण वेळे सुरू राहतील, तसेच वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यांची घरपोच सुविधा सकाळी पाच ते अकरा यावेळेत देता येतील, तसेच स्टॉलवरील विक्रीसाठी सकाळी सात ते अकरा या वेळेत परवानगी असेल. जिल्हाधिकाऱ्यांचे हे नवे आदेशाची अंमलबजावणी एक मेपर्यंत लागू राहणार आहे.

मद्य विक्री घरपोच

मद्यपींसाठी खूषखबर असून, त्यांना आता घरपोच दारू मिळणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यानुसार वाईन, बिअर, व्हिस्की, रमसह देशी दारूही घरपोच देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मद्यविक्रीसाठी दुकान उघडायचे नाही, तसेच मद्य दुकानात जाऊन खरेदी करायचे नाही. मद्य वाहतूक करताना अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Coronavirus : बेड मिळविण्यासाठी वशिलेबाजी; स्थानिक नेतेमंडळींची गोची!

गाेलमाल है भाई सब गाेलमाल है; Covid19 साता-याचा डॅशबाेर्ड सुधारा