esakal | जावलीत कोरोनाचा कहर; तालुक्यात 115 हून अधिक रुग्णांचा बळी, प्रशासनाकडून तत्काळ 'दखल'
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Hospital

जावलीत कोरोनाचा कहर; तालुक्यात 115 हून अधिक रुग्णांचा बळी, प्रशासनाकडून तत्काळ 'दखल'

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : जावळी तालुक्यात वैद्यकीय सुविधांअभावी कोरोना बाधित रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेत जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सोमर्डी (ता. जावळी) येथे तत्काळ 30 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची युध्दपातळीवर अंमलबजावणीही केल्याने जावलीतील रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी दिली.

जावली तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. पंधरा दिवसांतच कोरोना बाधित रुग्ण संख्येचा आकडा एक हजारा पार झाला आहे. तर आत्तापर्यंत तालुक्यात 115 हून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसागणिक कोरोनाची वाढती रुग्ण संख्येमुळे अपुर्‍या बेड संख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे गरीब रुग्णांची उपचारा अभावी मोठ्याप्रमाणात गैरसोय होत होती. काही रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने आपला जीव गमावण्याची वेळ आल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत सोमडी येथे कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले होते. या रुग्णालयात 30 बेडला ऑक्सिजनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कुडाळ व करहर विभागातील रूग्णांसाठी वाढीव बेड संख्येमुळे रुग्णांची आता मोठी सोय होणार आहे.

'दोन भावांच्या निधनानंतरही चार महिने कोरोनाशी लढले अन् अखेरच्या क्षणी जिंकले'

या कोविड रुग्णालयामुळे जावळीकर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून सोमर्डी हे कुडाळ व करहर या विभागातील मध्यवर्ती ठिकाण असणार आहे. त्यामुळे या विभागातील रूग्णांना मेढा किंवा सातारा येथे बेडसाठी धावाधाव करण्याची वेळ येणार नाही. सदरचे ऑक्सिजनची सुविधा असणारे 30 बेडचे कोविड रुग्णालय प्रत्य़क्षात सुरू करण्यात आले असून तेथे रुग्णांवर उपचारही सूरू झाले आहेत. सध्या या ठिकाणी 4 वैद्यकीय अधिकारी, 6 परिचारिका, 4 वाॅर्ड बाॅय अशा एकूण 14 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने रूग्णांना योग्य ते उपचार व सेवा मिळणार आहे. प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्यासह तहसीलदार श्री. पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी या रूग्णालयाची पाहणी करून आवश्यक त्या सुविधा पुरवण्याबाबत आदेश दिले आहेत.

वडूज पंचायतीची शववाहिका ठरतेय 'वरदान'; खटावातील तब्बल 180 मृतांची केलीय ने-आण

सोमर्डी रूग्णालयामुळे तालुक्यावरचा वैद्यकीय ताण कमी

सध्या तलुक्यात मेढा येथे 30 ऑक्सिजन बेडचे व रायगाव येथे 12 काॅन्सट्रेट ऑक्सिजन बेडचे कोविड रूग्णालय सुरू आहे. मात्र, वाढत्या रूग्णसंख्येमुळे सरदरचे बेड कमी पडत होते. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण येत होता. सोमर्डी येथे नव्याने 30 बेडचे रूग्णालय सुरू करण्यात प्रशासनाला यश आल्याने तालुक्यावरील वैद्यकीय ताण कमी होण्यास तसेच रूग्णांची बेडसाठीची धावाधावही कमी होण्यास मदत होणार आहे.

-सतीश बुध्दे, गटविकास अधिकारी, जावली

Edited By : Balkrishna Madhale

loading image