esakal | वडूज पंचायतीची शववाहिका ठरतेय 'वरदान'; खटावातील तब्बल 180 मृतांची केलीय ने-आण
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

वडूज पंचायतीची शववाहिका ठरतेय 'वरदान'; खटावातील तब्बल 180 मृतांची केलीय ने-आण

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : गेल्या वर्षभराच्या कालावधीत कोरोना संसर्गाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे शव नेण्यासाठी येथील नगरपंचायतीची शववाहिका जणू वरदानच ठरली आहे. या शववाहिकेने खटाव माण तालुक्यातील तब्बल १८० मृतांचे शव नेले आहेत.

वडूज हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे, शिवाय शहर परिसरात एक ते दोन किलोमिटर अंतरावर काही वस्त्या आहेत. या वस्त्यांवरील नागरिकांना अनेकवेळा एखादी व्यक्ती मृत झाल्यास अंत्यविधीसाठी एक ते दोन किलोमिटरची पायपीट करीत शहरातील येरळा नदीकाठावरील स्मशानभूमीपर्यंत चालत यावे लागत असते. नागरिकांची होणारी ही गैरसोय ओळखून नगरपंचायतीच्या तत्कालीन अध्यक्षा व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या शोभा सचिन माळी यांनी जिल्हा नियोजन समितीमधून नगरपंचायतीसाठी शववाहिका देण्याची मागणी केली होती. सौ. माळी यांच्या मागणीचा माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला. त्यानुसार नगरपंचायतीला सुमारे १७ लाख रूपये खर्चाची शववाहिनी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध झाली. जिल्हा नियोजन समितीमधून शववाहिनी उपलब्ध करणारी वडूज ही जिल्ह्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली.

साताऱ्यात मृत्यूतांडव सुरुच! 24 तासात 2383 बाधित, तर आजअखेर 2530 जणांचा मृत्यू

शववाहिनी उपलब्ध झाल्यानंतर तिचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पणही करण्यात आले. शहर परिसरातील वस्त्यांवरील लोकांना ही शववाहिनी अंत्यसंस्कारासाठी फायदेशीर ठरू लागली. कोरोना संसर्गामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर गावपातळीवरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. गावोगावी कोरोना बळी दिसू लागले. खटाव तालुक्यातही कोरोना संसर्गाने अनेकांना प्राण गमवावे लागले. या काळात कोरोना मृतांचे शव नेण्यासाठी या शववाहिकेची मोठी मदत होऊ लागली. खटाव तालुक्यातील मायणी, औंध, वडूज आदी तसेच माण तालुक्यातीलही काही कोरोना केअर सेंटर रूग्णालयात मृत्यू झालेल्या रूग्णांचे शव वाहन्याचे काम ही शववाहिनी गेली वर्षभर अव्याहतपणे करीत आहे.

धक्कादायक! बेड न मिळाल्याने तळबीडात तीन महिलांचा मृत्यू

या शववाहिनीने आत्तापर्यंत खटाव तालुक्यातील १४० व माण तालुक्यातील ४० असे एकूण १८० शव वाहिले आहेत. शिवाय सद्या दररोज ३०० किलो मिटरचा प्रवास ही शववाहिनी करीत आहे. या शववाहिनीवर चालक म्हणून मनोज पवार हे एकटेच गेली वर्षभर काम करीत आहेत. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्या जोडीला विशाल जगदाळे यांची चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वाहन चालविण्याबरोबरच ऐनवेळी अन्य कर्मचारी सोबत नसल्यास वेळप्रसंगी ते मृतदेहही शववाहिनीत ठेवण्याची भूमिका पार पाडत आहेत. नगरपंचायतीच्या या शववाहिनीने कोरोना काळात मोलाची कामगिरी पार पाडल्याचे दिसत आहे. नगरपंचायतीचे अध्यक्ष सुनिल गोडसे, उपाध्यक्षा सौ. किशोरी पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारीदेखील या शववाहिकेच्या नियोजनात योगदान देत आहेत.

वडूज शहराचा वाढता विस्तार, परिसरात एखाद्या व्यक्तीची मृत्यूसारखी होणारी दुर्दैवी घटना व सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावरून नागरिकांना मृताचे शव येथील स्मशानभूमीपर्यंत घेऊन यावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन नगरपंचायतीला शववाहिनी देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली. माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर यांनी या मागणीचा पाठपुरावा केला, त्यामुळे नगरपंचायतीला शववाहिनी उपलब्ध झाली. कोरोना काळात या शववाहिनीचा चांगला फायदा नागरिकांना झाला. सद्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीमधून व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडसाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

शोभा सचिन माळी, माजी नगराध्यक्षा व जिल्हा नियोजन समिती सदस्या

कोरोनाला रोखण्यासाठी वाईत 'कोविड टास्क फोर्स'; रुग्णांसह कुटुंबीयांना करणार मदत

कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर रूग्णालय व्यवस्थापनाचा अथवा त्यांच्या संबंधित नातेवाईकांचा दूरध्वनी येतो. त्यावेळी त्यांना तत्काळ शववाहिका उपलब्ध करून दिली जाते. या कामांत नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका देखील सक्रीयपणे योगदान देत आहेत.

माधव खांडेकर, मुख्याधिकारी, वडूज नगरपंचायत

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top