esakal | सातारा, कऱ्हाडात विजांच्या कडकडाटासह धुवांधार; विंग, येरवळे, वारूंजीत पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

सातारा, कऱ्हाडात विजांच्या कडकडाटासह धुवांधार; विंग, येरवळे, वारूंजीत पिकांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : शहरासह तालुक्‍यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने वेगवेगळ्या ठिकाणी नुकसानही झाले. येरवळेत वाऱ्याने पत्रा अंगावर पडल्याने दोन महिला जखमी झाल्या. केसे, पाडळी, सुपने भागात झाडे उन्मळून पडली. गारांमुळे पिकांचे नुकसान झाले. दुपारीही सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान झाले. विंग, येरवळे, वारूंजी, केसे, पाडळी, सुपने परिसरात मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. शहर परिसरासह तालुक्‍यातील विविध भागात शनिवारी सायंकाळसह दुपारीही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान झाले. सायंकाळी वाऱ्यासह पाऊस झाला. ओंड, उंडाळे, रेठरे बुद्रुक येथे तीन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान केले होते. सलग दुसऱ्या दिवशी दुपारीही पावसाच्या तडाख्याने नुकसान केले.

तांबवे : केसे, पाडळी व सुपने परिसराला मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याने झोडपले. काही वेळात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटातच पावसाला सुरवात झाली. भागात वीटभट्टी, गुऱ्हाळघरे आहेत. त्यांचेही नुकसान झाले. केसे येथील तांबी नावाच्या शिवारात गारांचा सडा पडला होता. गारांमुळे पिकांची दुरवस्था होऊन नुकसान झाले. अतिवेगातील वाऱ्यामुळे केसे येथे अनेक घरांवरील पत्र्याची पाने उडाली. झाडांच्या फांद्या पडल्या. उन्मळून पडलेले झाड कारवर कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. केसे गावात विजांच्या कडकडाटाने अनेकांचे टीव्ही, मिक्‍सर, फ्रिजसह इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे वायरिंग जळाले. सुपने, पाडळी परिसरात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे.

'दोन भावांच्या निधनानंतरही चार महिने कोरोनाशी लढले अन् अखेरच्या क्षणी जिंकले'

मुसळधार पावसाने साताऱ्याला झोडपले

सातारा : सातारा शहरासह तालुक्‍याच्या विविध भागास दुपारी चारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. झालेल्या जोरदार पावसामुळे सातारकरांची उकाड्यापासून काहीअंशी सुटका होण्यास मदत झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील उकाडा वाढला होता. दुपारनंतर आकाश दाटून हलक्‍या स्वरूपाचा पाऊस होत असल्याने सातारकर घामाच्या धारांनी निथळत होते. यामुळे सातारकर मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. रविवारी दुपारी चारनंतर सातारा शहरासह तालुक्‍याच्या विविध भागांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ओढेनाले पाण्याने ओसंडून वाहत होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साठून राहिले होते. या पावसामुळे अनेक बागांतील आंबे गळून पडले असून, वीज पडल्याने प्रतापगंज पेठेतील पुण्यशिल सुमित्राराजे नागरी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीचे थोडे नुकसान झाले.

Edited By : Balkrishna Madhale

loading image