esakal | उत्तर खटावात कांदा बियाणांत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक; विक्रीअभावी लाखोंचा फटका

बोलून बातमी शोधा

Onion Crop
उत्तर खटावात कांदा बियाणांत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक; विक्रीअभावी लाखोंचा फटका
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विसापूर (सातारा) : खासगी कृषी फार्म, व्यापारी तसेच काही शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कांदा बी सदोष निघाल्याने उत्तर खटावमधील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या कांदा बी पासून तयार केलेल्या रोपांची लागवड केलेल्या कांदा पिकाला संपूर्ण नळे निघाले असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच या कांदा पिकाचा रंगही एकसारखा नसल्याने मालाचा दर्जा घसरला असून, विक्रीअभावी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात अवकाळी पावसाने या भागातील लागवडीसाठी तयार केलेली कांदा रोपे वाया गेली होती. त्यामुळे टंचाई निर्माण होऊन कांदा बी चढ्या दराने विकले जात होते. लागवडीसाठी काही शेतकऱ्यांनी हातउसने किंवा कर्जाऊ रक्कम काढत कांदा बी खरेदी केले व त्याची रोपे तयार करून लागवड केली आहे. उत्तर खटावमधील जवळपास शेकडो शेतकऱ्यांनी मिळेल त्याच्याकडून मिळेल त्या दरात लाखो रुपयांचे कांदा बी खरेदी केले. कांदा बी शेतात टाकून नंतर रोप तयार केल्यानंतर डिसेंबर महिन्यात लागवडदेखील केली.

काळजी करु नका;गिर्याराेहक प्रियांकाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

कांदा लागवडीपर्यंत उत्तम प्रत असलेल्या रोपांना आजमितीस संपूर्ण नळे आले असून, पिकाचा रंग ही वेगवेगळा असल्याचे दिसत आहे. सदोष कांदा बियाणांमुळे कांदा उत्पादनात घट निर्माण झाली असून संपूर्ण रब्बी हंगाम वाया गेला असल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित विक्रेत्यांना प्रत्यक्षात शेताच्या बांधावर बोलवत पीक पाहणी करण्याची विनंती केली असता विक्रेते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भविष्यात शेतकऱ्यांची अशी फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तसेच खराब कांदा बी देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नाशिक काय घेऊन बसलात, इथं 66 रुग्णांचा जीव धाेक्यात आला हाेता

संबंधित कांदा बी विक्रेत्याकडून मी 3500 रुपये किलोप्रमाणे 15 किलो बियाणे खरेदी केले असून, साधारणपणे तीन ते चार एकरात कांदा पिकाची लागवड केली आहे. आजमितीस संपूर्ण कांदा पिकाला नळे निघाले असून कांदा पिकाला रंगही एकसारखा नसल्याने माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

-सूर्यकिरण निकम, प्रगतशील शेतकरी, काटकरवाडी

Edited By : Balkrishna Madhale