esakal | दसऱ्यानंतरच निवडणुकीची रणधुमाळी; BJP च्या उदयनराजेंचा 'निर्णय' NCP च्या कोर्टात I Udayanraje Bhosale
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता मतदारसंघनिहाय उमेदवार निश्चित करण्याची तयारी सुरू केलीय.

दसऱ्यानंतरच रणधुमाळी; BJP च्या उदयनराजेंचा 'निर्णय' NCP च्या कोर्टात

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा (Satara Bank Election 2021) कार्यक्रम दसऱ्यानंतर लागणार आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवरील हालचालींना सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) नेत्यांनी आता मतदारसंघनिहाय उमेदवार निश्चित करण्याची तयारी सुरू केली आहे, तर खासदार उदयनराजे भोसले यांना समावून घेण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Speaker Ramraje Naik- Nimbalkar) यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे; पण सर्वसमावेशक पॅनेलमध्ये खासदार उदयनराजेंना सामावून घेण्याबाबत शिवेंद्रसिंहराजेंशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे दसऱ्यानंतरच जिल्हा बॅंकेची रणधुमाळी उडणार आहे.

जिल्हा बॅंकेची निवडणूक शांततेच्या मार्गाने होण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रणनीती आखलेली आहे. त्यानुसार त्यांनी एका-एका मतदारसंघाचा प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. सध्या केवळ बॅंकेची मतदार यादी अंतिम झालेली आहे. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम हा दसऱ्यानंतर म्हणजे १८ ऑक्टोबरनंतरच होणार आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर तरी केवळ नेत्यांच्या बैठका आणि चर्चाच चालणार आहेत. जिल्हा बॅंकेत आमदार जयकुमार गोरे व खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना राष्ट्रवादीच्या पक्षविरहित पॅनेलमध्ये सामावून घेण्याबाबत निर्णय झालेला नाही, तरीही या दोघांनी कोणत्याही परिस्थितीत बॅंकेत संचालक होण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. या दोघांना घेतल्याशिवाय बॅंकेची निवडणूक सोपी होणार नाही, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही माहिती आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बॅंकेच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर सोपविली आहे.

हेही वाचा: राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो!

सोसायटीच्या ११ मतदारसंघांत जावळी, माण या मतदारसंघाबाबत चर्चा होऊन निर्णय झाला तर या सर्व जागा बिनविरोध होऊ शकतात. त्यानुसार चर्चेतून मार्ग काढणे हाच आता राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे पर्याय आहे. अन्यथा येथे तुल्यबळ उमेदवार देणे हाच पर्याय आहे, तसेच संस्था मतदारसंघात गृहनिर्माण आणि दुग्ध उत्पादक संस्था मतदारसंघ उदयनराजेंसाठी सोडणार, की त्यांच्याविरोधात उमेदवार दिला जाणार हे राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरणार आहे; पण सर्वसमावेशक पॅनेलमध्ये उदयनराजेंना सामावून घ्यायचे का, हा विषय आता आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर सोपविण्यात आला आहे. या दोघांना चर्चा करून वाद मिटवून निर्णय घ्यावा लागणार आहे, तर खरेदी- विक्री मतदारसंघातून इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे (कै.) लक्ष्मणराव पाटील या मतदारसंघातून निवडून आलेले असल्याने त्यांच्या वारसाला हा मतदारसंघ सोडला जाणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

हेही वाचा: 'त्यांना घेऊन निवडणूक लढवणार असाल, तर तो शरद पवारांचा अपमान असेल'

कृषी प्रक्रियेतून दादाराजे खर्डेकर यांचे वारसदार म्हणून शिवरुपराजे खर्डेकरांना संधी दिली गेली आहे. याही वेळेस पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. नागरी बॅंका व पतसंस्थांमधून इच्छुकांची नावे अनेक असली, तरी ॲड. उदयसिंह पाटील यांना या मतदारसंघातून ॲडजेस्ट करून सहकारमंत्र्यांचा कऱ्हाड सोसायटीतून मार्ग मोकळा केला जाणार आहे. त्यामध्ये कितीपत यश येणार यावर सर्व गणिते अवलंबून आहेत, तर मजूर संस्था व पाणीपुरवठा मतदारसंघातून अनिल देसाई, तसेच खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर इच्छुक आहेत. त्यापैकी कोणाला संधी दिली जाणार, की निवडणूक होणार हे ही महत्त्वाचे आहे. आरक्षणाच्या पाच जागांवर प्रत्येकाच्या मागणीनुसार जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे हा सर्व निर्णय दसऱ्यानंतर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीतच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: मेडिकल कॉलेजच्या जागेसाठी हुकूमशाहीनं कारवाई; आमदार शिंदेंचा सरकारला घरचा आहेर

loading image
go to top