मायणी, येरळवाडी तलावातील पाणी रब्बीसाठी द्या; खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

संजय जगताप
Thursday, 19 November 2020

यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने खटावच्या दुष्काळी भागातील येरळवाडी व मायणी तलाव भरून वाहू लागले आहेत. सध्या तलावातून दररोज कोट्यवधी लिटर पाणी नदीपात्रात वाहून जात आहे. दोन्ही तलावाच्या लाभ क्षेत्रातील बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या उरकलेल्या आहेत. पिकेही चांगली डोलू लागलीत. सध्या पिकांना पाणी देण्याची गरज आहे.

मायणी (ता. खटाव) : मायणी व येरळवाडी तलावातून वाहून वाया जाणारे पाणी कालव्याद्वारे शेती सिंचनासाठी दिल्यास रब्बीला टंचाईची झळ लागणार नाही. शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळेल. पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर त्याबाबतची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने खटावच्या दुष्काळी भागातील येरळवाडी व मायणी तलाव भरून वाहू लागले आहेत. सध्या तलावातून दररोज कोट्यवधी लिटर पाणी नदीपात्रात वाहून जात आहे. दोन्ही तलावाच्या लाभ क्षेत्रातील बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या उरकलेल्या आहेत. पिकेही चांगली डोलू लागलीत. सध्या पिकांना पाणी देण्याची गरज आहे. तलावातून वाहून जाणारे पाणी कालव्याच्या माध्यमातून पिकांना मिळाल्यास पुढील महिनाभराच्या कालावधीत होणारी पाण्याची मागणी कमी होऊन, टंचाईवर मात करणे शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे. 

VIDEO : व्वा रं पठ्ठ्या! दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्याची विक्रमी कामगिरी; झेंडूतून मिळवले तब्बल साडेपाच लाखांचे उत्पन्न

कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडल्यास त्या परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. विहिरीतील पाण्याचा उपसाही नियंत्रित होईल. कालव्याने पाणी सोडल्यास येरळवाडी तलावाच्या लाभक्षेत्रातील अंबवडे, मरडवाक, गोरेगाव, मोराळे, गुंडेवाडी, चितळी, निमसोड म्हासूर्णे आदी गावांना फायदा होईल, तर मायणी तलावाच्या लाभ क्षेत्रातील मायणी, शेडगेवाडी, चितळी, माहुली परिसरातील शेकडो एकर शेतीला लाभ होणार आहे. जमिनीतील ओलावा पूर्ण कमी होण्याअगोदर येरळवाडी तलावातील पाणी पाटाला सोडल्यास पिकांना फायदा होईल, असे मोराळेचे शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी नमूद केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Providing Water To Farmers From Mayani And Yeralwadi Lakes Satara News