सातारा मेडिकल काॅलेजचा प्रश्न मार्गी; आता निधीची गरज

उमेश बांबरे
Saturday, 22 August 2020

मेडिकल कॉलेजमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने आता जलद गतीने सर्व प्रक्रिया होत आहे. या आराखड्यास वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर निधीची तरतूद होऊन प्रत्यक्ष निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हा आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला आहे. या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होणार आहे.

सातारा : सर्व सातारकरांचे लक्ष लागलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी तब्बल 800 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर दिलेल्या जागेवर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. यामध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, लेक्‍चर हॉल, ऑपरेशन थिएटर, होस्टेल आदींचा समावेश असणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सर्वोत्तम दर्जाचे मेडिकल कॉलेज येथे उभारले जाणार आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजची उभारणी करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतल्याने आता चांगल्या दर्जाचे मेडिकल कॉलेज उभारले जाणार आहे. त्यासाठी कृष्णा खोऱ्याची 60 एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. आता मेडिकल कॉलेज प्रत्यक्ष उभारणीसाठी लागणारा निधी मंजूर होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तब्बल 800 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात मुख्य इमारत, लेक्‍चर हॉल, विविध कार्यालये, सुसज्ज प्रयोगशाळा, ऑपरेशन थिएटर, होस्टेल, बागबगीचा पार्किंगची सुविधा यांचा समावेश आहे. हा आठशे कोटींचा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 

दहा वर्षापासून हे कुटुंब शेतामधील मातीतूनच साकारतात गणपती - 

मेडिकल कॉलेजमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने आता जलद गतीने सर्व प्रक्रिया होणार आहेत. या आराखड्यास वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर निधीची तरतूद होऊन प्रत्यक्ष निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हा आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला आहे. या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होणार आहे. सध्या कृष्णा खोऱ्याकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झालेल्या 60 एकर जागेत सध्या असलेली पाटबंधारे विभागाची कार्यालये हस्तांतरित केली जाणार आहेत. ही कार्यालये खावली येथील महसूल विभागाच्या जागेत इमारत बांधली जाऊन तेथे स्थलांतरित होतील. तोपर्यंत सध्या उपलब्ध केलेल्या जागेतील वापराविना असलेल्या जुन्या इमारती पाडून जागेच्या स्वच्छतेची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर आराखड्यानुसार बांधकामे सुरू होतील. आता शासनाकडे पाठविलेल्या 800 कोटींच्या आराखड्यास मंजुरी मिळून निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महिलांना आता घरबसल्या मिळणार सॅनिटरी नॅपकीन! - 

देशात अव्वल दर्जाचे कॉलेज होणार 

सध्या कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत असल्याने सर्व आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त आहे. त्यातून वेळ काढून आरोग्य विभागाचे अधिकारी मेडिकल कॉलेजच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या कामाला थोडा वेळ लागणार असला तरी देशातील अव्वल दर्जाचे मेडिकल कॉलेज उभारले जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी सांगत आहेत. शहरात सुसज्ज असं मेडिकल काॅलेज होणार असल्याने विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे, तसेच या काॅलेजचा लाभ जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना होणार असल्याने सातारा जिल्ह्यात अनेक डाॅक्टर घडण्यास मदत होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar's attention in Satara Medical College has given impetus to the work