गैरहजर असूनही शिक्षकांवर कारवाई नाही

उपसभापतींनी विचारला जाब; गटविकास अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आश्वासन
 teacher
teachersakal

कऱ्हाड : मुळीकवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकमेव असणारे शिक्षक शाळेच्या पहिल्या दिवशी गैरहजर होते. त्याची माहिती देऊनही शिक्षण विभागाने संबंधितावर का कारवाई केली नाही? असा जाब उपसभापती रमेश देशमुख यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला. माजी सभापती फरिदा इनामदार, सदस्य अॅड. शरद पोळ यांनीही कारवाईचा आग्रह धरला. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाईचा तातडीने अहवाल पाठवू, असे आश्वासन दिले.

अध्यक्षस्थानी सभापती प्रणव ताटे होते. उपसभापती देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर सदस्य शरद पोळ यांनीही संबंधित शिक्षक ‘अध्यक्ष माझ्या पाठीशी आहेत, मला काही होत नाही,’ असे सांगत आहेत, असे नमूद केले. माजी सभापती फरिदा इनामदार यांनीही कारवाईबाबत विचारणा केली. गटविकास अधिकारी शिंदे यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून संबंधितांवर कारवाईचा अहवाल पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले. अॅड. पोळ यांनी तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींचा ऑडिट दोन वर्षे होऊनही रिपोर्ट मिळत नसल्याचा आरोप करून तीन महिन्यांत तो द्यावा, अशी मागणी केली. कृषी विभागाच्या आढाव्यात उपसभापती देशमुख यांनी महिनाभरापूर्वी सूचना देऊनही प्रगतशील पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या नावाचा बोर्ड का लावण्यात आला नाही? अशी विचारणा केली. देवराज पाटील यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी चार दिवसांत बोर्ड लावून घेतो, असे आश्वासन दिले.

प्रगतिपथावरील कामांची पाहणी करा

बांधकाम विभागाच्या आढाव्यावेळी देवराज पाटील यांनी बांधकाम विभागाच्या प्रगतीत असलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘‘बांधकाम विभागाकडून अनेकदा बहुतांश कामाबाबत विचारणा केल्यास संबंधित कामे प्रगतीत असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा विचारणा केल्यास वारंवार तीच सबब सांगण्यात येते. त्यामुळे अशा प्रगतिपथावरील कामांची गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापतींनी पाहणी करावी.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com