राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आल्यास विकास साधता येतो : सुनंदा पवार

रुपेश कदम
Tuesday, 25 August 2020

दुष्काळ पाचवीला पुजलेल्या माण तालुक्‍यातील बोथे गावावर मात्र निसर्ग फिदा झालाय. इथं आल्यावर आपण माण तालुक्‍यात आहोत यावर विश्वास ठेवण कठीण जातेय. विषारी औषधांमुळे पिकांची चव गेली आहे; पण इथल्या वातावरणात उत्तम चवीची पिके येऊ शकतात, असे प्रतिपादन सुनंदा पवार यांनी केले.

दहिवडी (जि. सातारा) : इथली माणसं सोन्यासारखी आहेत. मानापमान व राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आले, तर गावाचा विकास साध्य करता येतो. विषारी औषधांमुळे पिकांची चव गेली आहे; पण इथल्या वातावरणात उत्तम चवीची पिके येऊ शकतात. त्यांची प्रत, चव टिकवा, तसेच झाड हा आपला श्वास असून त्यांची जोपासना करा, असे आवाहन बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले. 

बोथे गावाला सुनंदा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे, कृषी तज्ज्ञ भालचंद्र पोळ, भांडवलीचे उपसरपंच सुनील सूर्यवंशी, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक अजित पवार, संजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल काटकर, रमेश शिंदे, आप्पासाहेब देशमुख आदी मान्यवरांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पवार बोलत होत्या. यावेळी सरपंच खाशीबाई जाधव, ग्रामसेवक दीपक आढाव व ग्रामस्थ उपस्थित होते. 

दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; शेतकरी रस्त्यावर

पवार पुढे म्हणाल्या, दुष्काळ पाचवीला पुजलेल्या माण तालुक्‍यातील बोथे गावावर मात्र निसर्ग फिदा झालाय. इथं आल्यावर आपण माण तालुक्‍यात आहोत यावर विश्वास ठेवण कठीण जातेय, असेही त्यांनी सांगितले. भगवानराव जगदाळे यांनी बोथे गाव पर्यटनस्थळ होण्यासाठी आदर्श असून, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. भालचंद्र पोळ यांनी योग्य बटाटा बियाणांची निवड करून विषमुक्त बटाट्याचा खास 'बोथे ब्रॅंड' निर्माण करूयात, असे आवाहन केले. 

..अखेर माण तालुक्‍याच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी; युवकांना मोठा दिलासा

गाव पाहणीत येलमारच्या शेत परिसरात बटाटा, सोयाबीन, उडीद पिकांची पाहणी केली. गार वारे, पावसाची भुरभुर, हिरवागार निसर्ग, खळाळणारे पाणी व पवनचक्‍क्‍यांची फिरणारी पाती असा हा येथील रमणीय परिसर पाहून सर्वांनीच "कशाला महाबळेश्वरला जायचं, बोथे महाबळेश्वरपेक्षा कमी नाही' असे उद्‌गार काढले. पाहणीनंतर पाहुण्यांचे ग्रामपंचायत कार्यालयात गावात पिकविलेल्या देशी- विदेशी भाज्या देऊन स्वागत करण्यात आला. बोथे हे पर्यटनस्थळ होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात, असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development Can Be Achieved If We Put Politics Aside And Come Together