
कुणी ऊसतोड टोळी देता का टोळी...
विसापूर : पुसेगाव-बुध परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊसतोडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊसतोड कामगारांच्या कमतरतेमुळे फडात वेळेवर तोड येत नसल्याने उसाच्या पिकाचे नुकसान होऊ लागले असून ‘कुणी ऊसतोड टोळी देता का टोळी...” अशी विनवणी करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
दमदार पाऊस व पाण्याच्या मुबलकतेमुळे यंदा या परिसरात उसाचे पीक जोमात बहरले आहे. पण, तोडणी वेळेत होत नसल्याने उसाला तुरे फुटू लागले आहेत. तुरे निघाल्याने ऊस पोकळ होऊन वजन घटण्याची चिन्हे आहेत. या परिसरातील ऊस कार्यक्षेत्रातील जरंडेश्वर, पडळ, गोपूज, दालमिया या कारखान्यांमार्फत नेला जात आहे. मात्र, मजूर टंचाईमुळे यंदा या कारखान्यांकडे नोंदणी असूनसुद्धा उसाला तोड मिळेल का नाही? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना सतावत आहे.
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
दरम्यान, ऊस तोडणीसाठी उशीर झाल्यास उत्पादन घटणार असून, पिकासाठी झालेला खर्च बघता उत्पन्नाचा ताळमेळ बसणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे ऊसतोड मिळावी, यासाठी शेतकऱ्यांकडून सध्या कारखान्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले जात आहेत. मात्र, या समस्येकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.आजमितीला या भागातील ७० टक्के ऊस शिवारात अजूनही तसाच उभा आहे. हा ऊस वेळेवर तुटला नाही तर अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ऊस वेळेवर तुटावा, यासाठी या भागात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या वाढवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
Web Title: Does Anyone Give Sugarcane Workers Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..