

हेमंत पवार
कऱ्हाड : स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीतर्फे त्यांच्या ५१ व्या स्मृतिदिनी मंगळवारी उंडाळे येथे ४२ वे स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यादिवशी यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. भरत वतवाणी (Bharat Vatwani) यांना माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, अशी माहिती स्मारक समितीचे विश्वस्त अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस प्रा. धनाजी काटकर उपस्थित होते.
प्राचार्य कणसे म्हणाले, ‘‘माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील- उंडाळकर यांनी स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय स्वातंत्रसैनिकांचे अधिवेशन व समाजप्रबोधन कार्यक्रम सुरू केले. १९७३ पासून ही परंपरा अखंड सुरू आहे. उंडाळकर यांच्या पश्चात स्मारक समितीने अॅड. उदयसिंह पाटील याच्या नेतृत्वाखाली ही परंपरा सुरू ठेवली आहे.
यंदाचा पुरस्कार डॉ. वतवाणी यांना प्रदान करण्यात येईल. डॉ. वतवाणी यांनी रस्त्याने फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी मोठे काम केले आहे. आतापर्यंत तब्बल सात हजार रुग्णांवर उपचार करून त्यांना डॉ. वतवाणी यांनी त्यांच्या- त्यांच्या घरी पाठवले आहे. त्यांनी १९८८ मध्ये मनोरुग्णासाठी श्रद्धा पुनर्वसन केंद्र स्थापन केले.
कर्जत येथे हे केंद्र सुरू असून, १२० मनोरुग्ण तेथे उपचार घेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन फिलीपाईन्स सरकारने त्यांचा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन डॉ. वतवाणी यांचा यावर्षीचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे. कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, माजी सैनिक उपस्थित राहणार आहेत. त्यास उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. उंडाळकर यांनी केले आहे.
आजपर्यंतचे पुरस्कारप्राप्त मान्यवर...
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने आतापर्यंत स्वातंत्रसैनिक माजी राजदूत एन. जी. गोरे, सुप्रसिद्ध कवी ना. धों. महानोर, स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता, स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या नीलमताई देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, साहित्यिक जी. पी. प्रधान, शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, शांताराम गरुड, प्राचार्य पी. बी. पाटील, प्रभाकर कुंटे, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषितज्ज्ञ डॉ. जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. अभय बंग, पद्मश्री तात्याराव लहाने, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, अर्थशास्त्रज्ञ निळकंठ रथ, लेखक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे, डॉ. प्रकाश आमटे, स्वातंत्र्यसैनिक भाई वैद्य, लेखक सुरेश द्वादशीवार, डॉ. विवेक सावंत, पद्मश्री डॉ. गणेश देवी, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, अभिनेते मकरंद अनासपुरे, अशोक जैन यांनी या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.