esakal | 'जाती-जमातींना मिळालेलं आरक्षण व्यक्‍तिगत स्वार्थासाठी नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

Reservation

मागासांचे कोणतेही म्हणणे नसताना दहा वर्षे आरक्षण सांगितलेले असताना इथल्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी ते सुरूच ठेवले. म्हणून आता याचेदेखील इंटर्नल ऑडिट व्हायला हवे.

'जाती-जमातींना मिळालेलं आरक्षण व्यक्‍तिगत स्वार्थासाठी नाही'

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : सामाजिक असमानता पाहून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी (Chhatrapati Shahu Maharaj) अनेक जाती-जमातींना न्याय मिळावा म्हणून सामाजिक प्रतिनिधित्वासाठी आरक्षण (Reservation) दिले होते, स्वार्थासाठी नाही, असे मत दिल्ली येथील विश्वविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. राजकुमार (Dr. Rajkumar) यांनी व्यक्त केले. येथील लुंबिनी संघ सातारा (Lumbini Sangh Satara), समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था व शिक्षक हितकारिणी संघटना, महाराष्ट्र या तिन्ही संस्थांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ‘आरक्षण : सामाजिक न्याय आणि भारतीय लोकशाही’ या विषयावर डॉ. राजकुमार बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूरच्या महावीर कॉलेजचे प्रा. डॉ. भारत नाईक हे उपस्थित होते. (Dr. Rajkumar Expressed The View That Reservation Is Not For Personal Interest bam92)

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुणे कराराचा संदर्भ देत डॉ. राजकुमार यांनी मागासवर्गीय आरक्षण, राजकीय आरक्षण याचा उहापोह केला. त्यांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘स्वतंत्र मतदारसंघ नसल्याने मागासवर्गीयांना संयुक्त मतदारसंघ मिळूनदेखील मागास समाजाला राजकीय प्रतिनिधित्व केवळ मिळाले. पण, त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा उद्देश सफल झाला नाही. त्यामुळेच मागासांचे कोणतेही म्हणणे नसताना दहा वर्षे आरक्षण सांगितलेले असताना इथल्या प्रस्थापित सत्ताधारी यांनी ते सुरूच ठेवले. म्हणून आता याचेदेखील इंटर्नल ऑडिट व्हायला हवे. आरक्षणाच्या लाभार्थी प्राध्यापकांनी मानवतावादी विचारधारा प्रसारित केली पाहिजे. फुले, आंबेडकरी विचाराचे आंदोलन नोकरदार वर्ग हाच चालवू शकतो.’’

हेही वाचा: 'मराठा आंदोलकांवर गुन्हे; मग पटोले, चव्हाण, भाई जगतापांवर का नाही?'

डॉ. भरत नाईक म्हणाले, ‘‘आरक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. न्याय ही मानवी समाजाची मूलभूत गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतातील सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. राजकीय लोकशाहीने सामाजिक लोकशाही आणली पाहिजे. ही आणण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे.’’ प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रा. डॉ. दीपक गरुड यांनी केले. शिक्षक हितकारिणी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. लुंबिनी संघाचे अध्यक्ष डॉ. गोरख बनसोडे यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. गीता शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे यांनी आभार मानले. व्याख्यानास विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, संघटनांचे सदस्य, शासकीय, निमशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Dr. Rajkumar Expressed The View That Reservation Is Not For Personal Interest bam92

loading image