डॉ. धर्माधिकारी प्रतिष्‍ठानकडून ८४ टन कचरा हद्दपार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr.Dharmadhikari Pratisthan Deported garbage

Satara : डॉ. धर्माधिकारी प्रतिष्‍ठानकडून ८४ टन कचरा हद्दपार!

सातारा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात १०८ किलोमीटरचा रस्ता परिसर स्वच्छता अभियानासाठी दत्तक घेतला आहे. वर्षभर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील रविवारी हजारो सदस्यांकरवी स्वच्छता अभियान सुरू आहे. अभियानातून स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. दुसऱ्यांदा झालेल्या अभियानात २ हजार १२७ सदस्यांनी सहभाग घेऊन ८४ टन कचरा हद्दपार केला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग) यांच्या वतीने भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निरूपणकार व समाजप्रबोधनकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त रविवारी जिल्ह्यात दुसऱ्यांदा सर्वत्र स्वच्छता अभियान झाले. सातारा, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण, वाई, माण, खटाव, जावळी, पिलीव (सोलापूर) येथे वर्षभर २५ ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहे.

दुसऱ्यांदा झालेल्या महिन्याच्या चौथ्या रविवारी हजारो सदस्यांनी अवघ्या अडीच ते तीन तासांत ८४ टन कचरा संकलित केला. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण, नारळवाडी, धोंडेवाडी (कऱ्हाड), नेहरवाडी, अनवडी, प्रभुचीवाडी, सातारारोड, खातगुण, बुध, निमसोड, म्हसवड, वडगाव, नांदगाव, किकली, पिलीव (सोलापूर) समर्थ बैठकीतील हजारो सदस्यांनी अभियानात सहभाग घेतला.

दत्तक रस्ता परिसर स्वच्छता अभियान उपक्रमातून जनजागृती होत आहे. प्रतिष्ठानच्या उपक्रमाने प्रेरित होऊन स्वच्छ शहर सुंदर शहर स्पर्धेत देशात कऱ्हाड नगरपालिकेस तिसरा क्रमांक मिळाला. यापुढे प्रथम क्रमांक मिळण्यास नक्कीच मदत होईल.

- विजय वाटेगावकर, माजी नगरसेवक, कऱ्हाड