Phaltan Drought : फलटण दुष्‍काळाच्या उंबरठ्यावर; टंचाईग्रस्त गावांची व टँकरच्या संख्येत वाढ

तलाव कोरडे, विहिरी आटल्या, कालवाही बंद : बळिराजा चिंतेत
Water Tanker
Water Tankeresakal

फलटण शहर - जुलै महिना संपत आला, तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने टंचाईग्रस्त गावांची व टँकरची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर धरणांमध्ये अद्यापही पाणीसाठा कमीच असल्याने बळिराजाच्या चिंतेचे सावट आणखी गडद होत आहे. त्यामुळे तालुका ‘दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय’ असेच सध्याचे चित्र आहे.

तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाणी योजनांना पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर, वीर, गुंजवणी, नीरा-देवघर या धरणांतील पाणीसाठा आजमितीस गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होऊन धरणातील पाणीसाठे वाढत नाहीत. तोपर्यंत, अन्य पर्याय नसल्याने औद्योगिकरण, शेती व पिण्यासाठी उपलब्ध असणारे पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.

नीरा नदीवरून वीर धरणापासून नीरा उजवा कालव्याद्वारे खंडाळ्यासह फलटण तालुक्याला पाणीपुरवठा होतो. काल (शनिवारी) सकाळी जलसंपदा विभागाकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सद्यःस्थितीत वीर धरणात एकूण साठवण क्षमतेच्या केवळ ४२.८६ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. गतवर्षी याच काळात या धरणात ९६.७५ टक्के पाणीसाठा होता.

भाटघर धरणात ४५.८९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या तारखेला या धरणात यंदा इतकाच पाणीसाठा होता. गुंजवणी धरणात ४५.९५ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ८० टक्के पाणीसाठा होता. नीरा-देवघर धरणात ५५.३५ टक्के असून, गतवर्षी ६० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाण्याचे अल्प प्रमाण परिस्थितीची भीषणता दाखविते.

कृष्णा नदीवरील धोम बलकवडी धरणात समाधानकारक पाणी आहे. सध्या या धरणात ८९ टक्के पाणीसाठा आहे. ही बाब या धरणावरील कालव्याच्या लाभक्षेत्रातील तालुक्यातील गावांना दिलासा देणारी आहे. धोम-बलकवडी धरणाच्या पाण्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई गेल्या काही वर्षांत संपुष्टात आली होती; पण यावर्षी पावसाने ओढ दिल्याने टँकरची मागणी सुरू झाली आहे.

तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. पावसाची गैरहजेरी, नीरा उजवा कालवा बंद आणि आटलेल्या विहिरी यामुळे यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकरी चिंतेत पडल्याचे पाहायला मिळते. शिवाय जून महिन्यात झालेल्या तुरळक पावसाच्या जिवावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या.

मात्र, पावसाचा जोर कायम न राहिल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आल्याचेही दिसते. अशा परिस्थितीत बियाणे, खते, मजुरी आदी खर्चाचा अतिरिक्त भार पडण्याच्या शक्यतेनेही शेतकरी हवालदिल झाला आहे. जुलै महिना संपत आला असताना अद्याप तालुका पावसाविना कोरडाच असून, तालुक्याला मुख्यत्वे पाणी पुरवठा करणाऱ्या वीर धरणानेही तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या काही दिवसांत हीच परिस्थिती कायम राहिल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com