‘ईडब्ल्यूएस’ मिळण्याचा मार्ग खुलाच

जिल्ह्यातील सर्वच तहसीलमध्ये मिळणार दाखले; शासनाकडून कोणताही आदेश नाही
satara collectore office
satara collectore office

कऱ्हाड/सातारा - मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र (ईडब्ल्यूएस) देण्यास काही तहसील कार्यालयांकडून अडवणूक होत असल्याने जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ईडब्ल्यूएसचे दाखले देऊ नयेत, असा कोणताही शासनाकडून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश दिलेला नाही. त्यामुळे रीतसर अर्ज करून योग्य कागदपत्रे सादर केल्यास ईडब्ल्यूएसचे दाखले सर्वच तहसील कार्यालयातून मिळणार आहेत.

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास काही तहसील कार्यालयांकडून टाळाटाळ केली जात होती. मात्र, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पुन्हा हे दाखले देण्यास सुरुवात झाली आहे.

महावितरणच्या नोकरभरतीच्या अनुषंगाने एसईबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या वादाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. त्या निकालानंतर काही माध्यमांनी मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द झाल्याचा अर्थ लावून गैरसमज निर्माण केला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयांनी मराठा विद्यार्थी व उमेदवारांना अचानक ईडब्ल्यूएस दाखले देणेच बंद केले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा केवळ महावितरणच्या नोकरभरती प्रक्रियेसंदर्भात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण स्थगित केल्यामुळे त्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोट्यातून (पूर्वलक्षी प्रभावाने) नियुक्ती द्यावी, या शासन निर्णयाच्या विषयी तो निकाल दिला आहे. मात्र, सरसकट संपूर्ण मराठा समाजालाच ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देऊ नये, असा त्याचा अर्थ नव्हता. त्याबाबत गैरसमज झाल्याने तहसील कार्यालयातून दाखले देणे बंद करण्यात आले होते. त्याबाबत कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्याकडे सर्व तहसील कार्यालयांना मराठा समाजाला ईडब्ल्यूएस दाखले पुन्हा पूर्ववत देण्याच्या सूचना कराव्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन आता तहसील कार्यालयांनी पूर्ववत ईडब्ल्यूएस दाखले देणे सुरू केले आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांत समाधानाचे वातावरण आहे. त्यांना महाविद्यालयीन व अन्य प्रवेशासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

दाखल्यासाठी अटी

  • उमेदवार सामान्य प्रवर्गातील असावा

  • कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे

  • महाराष्ट्राचे रहिवासी असावेत

  • कुटुंबात पाच एकर किंवा त्याहून अधिक शेत जमीन नसावी.

  • कुटुंबांकडे एक हजार स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा अधिकचा निवासी प्लॉट नसावा.

दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे...

  • आधारकार्ड

  • मिळकत प्रमाणपत्र

  • जातीचे प्रमाणपत्र

  • पॅन कार्ड

  • बीपीएल कार्ड

  • बॅंक स्टेटमेंट

मराठा समाजासाठी ईडब्ल्यूएस दाखले तहसीलदार कार्यालयातून देणे सुरू आहे. मराठा समाजातील तरुणांनी त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून ते दाखले घ्यावेत. कोणतीही अडचण असल्यास संपर्क साधावा.

- विजय पवार, तहसीलदार, कऱ्हाड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com