esakal | घाटामध्ये वाहतूक ठप्प; नियंत्रणासाठी पोलिसांची दमछाक | satara
sakal

बोलून बातमी शोधा

 घाटामध्ये वाहतूक ठप्प

Satara : घाटामध्ये वाहतूक ठप्प; नियंत्रणासाठी पोलिसांची दमछाक

sakal_logo
By
प्रा.राजेश पाटील

सातारा : कोरोनाच्या कालावधीत बंद असलेले श्री क्षेत्र नाईकबा देवाचे मंदीर दर्शनासाठी खुले झाल्याने आज महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांनी तेथे रेकॉर्डब्रेक गर्दी केली. अनपेक्षितपणे एवढी प्रचंड गर्दी झाल्याने पोलीस कुमूक अपुरी पडली, घटमार्गासह ढेबेवाडी- सणबुर मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने भाविकांचे हाल झाले. पायरीमार्ग व डोंगरातून पायपीट करत त्यांना मंदिरापर्यंत पोहचावे लागले.

अनेक दिवसांपासून बंद असलेले बनपुरी येथील डोंगर माथ्यावरील श्री नाईकबा देवाचे मंदीर नुकतेच खुले केल्याने दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. सध्या सुरू असलेला नवरात्रोत्सव आणि बुधवारी (ता.१३) होणारा श्रींचा जागर यामुळे आज भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी अनुभवायला मिळाली. विविध एसटी आगाराच्या बसेससह विविध वाहनांनी भाविक कुटुंबियांसह दाखल झाल्याने डोंगरमाथ्यावरील मैदान फुल्ल होवून घाटमार्गात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन सुबोध भावेचा चिमटा, म्हणाला...

जानुगडेवाडी येथे पायरीमार्गाच्या प्रवेशव्दारावर भाविकांची मोठी गर्दी होती तेथून घाटमार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा होत्या. अनेक भाविकांनी वाहने रस्त्याकडेला उभी करून डोंगरावरील मंदिराकडे पायी चालत जाणेच पसंत केले. मंदीरात भाविकांची मोठी गर्दी होती. मुखदर्शन व थेट दर्शनासाठी मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. गर्दी आवाक्याच्या बाहेर गेल्याने सॅनिटाइझर वापर,सोशल डिस्टनसिंग आदीचे नियोजन कोलमडले होते. अनपेक्षितपणे एवढी प्रचंड गर्दी झाल्याने पोलीस कुमूक अपुरी पडली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस, होमगार्ड व अन्य पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवसभर मोठे परिश्रम घेताना दिसून आले. अनेक भाविकांनीही स्वतः घाटात थांबून पोलिसांना मदत केली.

loading image
go to top