esakal | खटावातील रामाच्या डोंगरात वृक्षसंपदा आगीत भस्मसात; वन्यजीवांचीही होरपळ

बोलून बातमी शोधा

Forest
खटावातील रामाच्या डोंगरात वृक्षसंपदा आगीत भस्मसात; वन्यजीवांचीही होरपळ
sakal_logo
By
राजेंद्र शिंदे

खटाव : खटाव तालुक्‍यातील अंभेरी, जांब, बिटलेवाडी, रेवलकरवाडी व कोरेगाव तालुक्‍यातील अंभेरी, साप या हद्दीत येणाऱ्या रामाच्या डोंगरास दोन दिवसांपासून लागलेल्या वणव्यामुळे वनसंपदा व जीवसृष्टीची हानी झाल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. वन विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना येथील निसर्गप्रेमी करत आहेत.

या आगीत शेकडो जीव व वनस्पती भस्मसात झाल्या आहेत. या डोंगरावर साग, ऐन, धावडा, शिवण, पांगरा, आवळा, आंबा, बिबवा, भावा, जांभूळ, अर्जुन, सादडा, शिसू, सुबाभूळ अशी विविध प्रकारची लहानमोठी झाडे आहेत. याशिवाय करवंद, कारी, घाणेरींची अनेक झुडपे आहेत. शतावरी, मुरूड शेंग, निरगुडी, कोरपड, अश्वगंधा, दगडीफूल, चंदन, खैर, पळस, नागरमोथा, लाजाळू, अडूळसा, बेल अशा वनौषधींचा खजिना म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल वाढू लागले आहे.

लोणंदची 'सोना' देणार महाराष्ट्राला 'संजीवनी'; अलॉयजमध्ये 15 टन ‘ऑक्सिजन’ची निर्मिती

येथे माकड, सांबर, हरीण, वानर, ससा, लांडगा, कोल्हा, तरस, रानमांजर, रानडुक्कर, मुंगूस, विविध प्रकारचे साप व घोरपड असे अनेक सरपटणारे प्राणी व कीटक येथे वास्तव्यास आहेत. असे विविध प्रकारचे प्राणी व शेकडो पक्षी वास्तव्यास आहेत. या आगीच्या भक्ष्यस्थानी हजारो झाडे व पशुपक्षी सापडण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. वृक्षलागवड उपक्रमांतर्गत या भागात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी हजारो रोपट्यांची लागवड केली होती. या रोपट्यांची वाढ होत असतानाच डोंगरावर लागलेल्या वणव्यात या उपक्रमातील रोपटी जळून खाक झाल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

Edited By : Balkrishna Madhale